कसबा बोरगावमध्ये भिंत कोसळून शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:09 AM2018-07-13T01:09:57+5:302018-07-13T01:10:11+5:30
पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे शेततळ्याची संरक्षण भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे शेततळ्याची संरक्षण भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीपती ज्ञानू चौगले (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कसबा बोरगाव येथे रस्त्यालगतच अजित नरके यांचे फार्म हाऊस आहे. त्यांनी या ठिकाणी एक एकर क्षेत्रात शेततळे बांधले असून, त्याला शंभर फूट लांबीची व वीस फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास श्रीपती चौगले हे पत्नी उषासोबत वैरणीला गेले होते. उषा वैरण घेऊन शेततळ्याच्या भिंतीलगत असलेल्या रस्त्यावरूनच पुढे घरी गेल्या.
काही वेळाने त्यांच्यापाठोपाठ आलेल्या श्रीपती चौगले यांच्या अंगावर ही भिंत अचानक कोसळली आणि ढिगाºयाखाली ते गाडले. भिंत कोसळल्याचे समजताच गावकरी जमा झाले. गावकºयांनी चार तासांनंतर ब्रेकरच्या साह्याने भिंत फोडून श्रीपती यांचा मृतदेह बाहेर काढला.
भिंतीच्या बांधकामात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करीत यातील काहीजणांची संदीप नरके यांच्यासोबत वादावादी झाली. त्यांच्या अंगावर ते धावून गेले. यावेळी अॅड. प्रकाश देसाई व पन्हाळ्याचे फौजदार रवींद्र साळोखे, शशिकांत गिरी यांनी अजित नरके यांच्यासोबत ग्रामस्थांसमोर चर्चा केली. ग्रामस्थांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी संदीप नरके यांनी चौगले कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगताच जमाव शांत झाला.
मोठा अनर्थ टळला
या भिंतीजवळून भात रोप लावण्यासाठी दिवसा अनेक महिला व शेतकरी एकत्ररीत्या जातात; परंतु यावेळी जास्त कोणी नसल्यामुळेच मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. भिंतीच्या वरील बाजूस अनेक दिवसांपासून भांगा धरला असताना याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित होत होता.