कारभार पसंत असल्याने महाविकास आघाडीला कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:27 AM2021-01-19T04:27:11+5:302021-01-19T04:27:11+5:30
कागल : राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा कारभार पसंत पडल्याने आणि गावचा विकास होणार, ही खात्री असल्याने राज्यातील ग्रामपंचायतींच्या ...
कागल :
राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा कारभार पसंत पडल्याने आणि गावचा विकास होणार, ही खात्री असल्याने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयी घोडदौड कायम आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील,जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने उपस्थित होते.
कागल तालुक्यात ९० टक्के ठिकाणी महाविकास आघाडी विजयी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ही स्थिती आहे. सरपंच पदाचे आरक्षण आणि निवडी महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर आरक्षण ठेवल्याने एका प्रभागावर लक्ष केंद्रित होणे थांबले आहे. मतदानाची टक्केवारीही वाढली आहे. तालुक्यात ५२७ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २३४ सदस्य विजयी झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. तर शाहू साखर कारखान्याच्या सभोवती असलेल्या एकाही गावात समरजित घाटगेंना यश मिळाले नाही, अशी टीका भय्या माने यांनी केली.
चौकट.
○ राज्याचे राजकारण करताना गल्लीही सांभाळावी लागते.
राजकारणात आपली गल्ली, गाव, तालुका जिल्हा याकडे लक्ष ठेवावे लागते, अन्यथा निकाल उलटा गेला की टिकेला सामोरे जावे लागते. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घातले होते की नाही, हे माहीत नाही; पण गावची सत्ता राखता येत नाही, ही नामुष्की पदरात येते, अशी खोचक प्रतिक्रियाही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.