Kolhapur: कवठेगुलंदच्या तरुणास फाशीची शिक्षा; पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा केला होता खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:07 PM2024-03-26T16:07:25+5:302024-03-26T16:09:11+5:30
जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
संदीप बावचे
जयसिंगपूर : चारित्र्याचा संशय घेवून भांडण काढून यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा खून केल्याप्रकरणी कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ४०) याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
आरोपीची मुलगी हिच्यासह २४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. येथील सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खुनाची ही घटना यड्राव (ता. शिरोळ) येथे आॅक्टोंबर २०१८ साली घडली होती.
याबाबत माहिती अशी की, पार्वती औद्योगिक वसाहत यड्राव येथे आरोपी प्रदीप जगताप याने पत्नी रूपाली जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून भांडण काढले होते. यावेळी यंत्रमागाच्या लाकडी माºयाने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित आयरेकर यांना डोकीत मारून ठार केले होते. शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
तत्कालीन पोलिस निरीक्षक आय.एस.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एस.हारगुडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. सरकारी वकील व्ही.जी.सरदेसाई यांचा युक्तिवाद आणि आरोपी जगताप यांची मुलगी सानवी हिने दिलेली साक्ष, आरोपीच्या कपड्यावर मृतांच्या रक्ताचे लागलेले डाग, घटनेपुर्वी झालेले भांडणाबाबत साक्षीदारांनी दिलेला जबाबानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.