राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ सर्वोत्कृष्ट माहितीपट, विंटेज चित्रपट महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:39 PM2019-10-07T12:39:23+5:302019-10-07T12:42:30+5:30
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दुसऱ्या विंटेज ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’मध्ये राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ने पटकाविला. दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक, रंगकर्मी देवेशजी इनामदार (औरंगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दुसऱ्या विंटेज ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’मध्ये राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ने पटकाविला. दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक, रंगकर्मी देवेशजी इनामदार (औरंगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
विंटेज इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवारपासून प्रारंभ झाला. दोन दिवस झालेल्या या महोत्सवात २१ देशांतील २१० चित्रपट दाखविण्यात आले. महोत्सवात म्युझिक व्हिडिओंसह जपान, युके, रशिया, कॅनडा, अमेरिका, मकाऊ, इराण, फ्रान्स, सौदी अरेबिया, नेदरलॅँड, स्वित्झर्लंड, स्पेन, चीन, बांगलादेश अशा विविध देशांतील चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन फिल्मचा समावेश आहे.
देशविदेशांतील विविध भाषा, संस्कृतीतील लघुपट पाहताना विविधतेतून एकात्मता याची सातत्याने जाणीव होत राहते, असे प्रतिपादन ‘मीट द ज्यूरी’अंतर्गत डॉ. अनमोल कोठाडिया यांनी उपस्थित लघुपटकर्ते आणि प्रेक्षक यांच्याशी संवाद साधताना केले. त्यानंतर बक्षीस वितरण झाले. महोत्सवाचे आयोजन विंटेज फिल्म फौंडेशनचे चेतन पडोळे, सचिन भोईराजे यांनी केले होते. सायली प्रभावळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आंतरराष्ट्रीय गटात : सर्वोत्कृष्ट माहितीपट : ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ (अमेरिका), सर्वोत्कृष्ट लघुपट : 'रिटर्न फ्रॉम द स्टार्स' (रशिया), विशेष ज्यूरी पुरस्कार- ‘हेलेना’ (झेक प्रजासत्ताक / शंतनू नाईक), सर्वोत्कृष्ट अनिमेशनपट- ‘नाऊ युअर होम’ (भारत / प्रसाद महेकर ) हे ठरले.
राष्ट्रीय गटात : ‘कवडसा’ (धनश्री कोल्हे) ने सर्वोत्कृष्ट माहितीपटासह, छायाचित्रण (श्रीजित बसू) आणि विशेष ज्यूरी पुरस्कार (कलरिस्ट - राहुल मर्चंट) असे तीन पुरस्कार पटकावले; तर संकलनाचा हिरण्या कलिता हिला ‘कैरुस्कुरो’साठी मिळाला. ‘स्टेन्स’ (रिहा मॅथ्यूज / मल्याळम)ने सर्वोत्कृष्ट लघुपटासह, दिग्दर्शन आणि संकलनाचे असे तीन पुरस्कार पटकावले. ‘लुक ट द स्काय’ (अशोक वैलौउ, मणिपूर - पाउलाह या बोलीभाषेतील)ने द्वितीयसह छायाचित्रण (जितू जॉर्ज) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘शैला'ज (नेहा आर.टी.) ने विशेष ज्यूरी पुरस्कार पटकावला.
‘गोल्डन टॉयलेट’(मराठी)ने पटकथा (उमेश मालन) आणि अभिनेत्री (प्रियांका चव्हाण) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘द वेटिंग’ (तमिळ)ने ध्वनिसंयोजन (राजकृष्णन एम. आर.) आणि अभिनेता (शेषू) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘पॅम्पलेट’ (मराठी)ला बाल अभिनयासाठीचा प्रमोद रणखांबे यांना मिळाला.
महोत्सव आयोजकांनी निवड समितीच्या शिफारशीनुसार ‘दृष्टिकोन’ (अरुण अडसुळे) आणि 'खानेह बे दुश' (मन्सूर येझदी) यांची विशेष नोंद घेतली. सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम ‘हालत’ ( चेतन कचरे) हा ठरला. या महोत्सवासाठी परीक्षक म्हणून समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया (कोल्हापूर), लघुपटकर्ता निनाद कुलकर्णी (पुणे), तर म्युझिक अल्बम गटासाठी नितीन पेडणेकर (मुंबई) यांनी काम पहिले.