kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 04:11 PM2021-12-03T16:11:55+5:302021-12-03T16:22:10+5:30
१०६ ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला.
आजरा : जिल्हा बँकेसाठी आजरा तालुक्यातून सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी ठराव धारकांचे शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्यातील १०६ ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला.
अर्ज दाखल करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जि.प. सदस्य सुनिता रेडेकर, माजी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा गुरव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संचालक विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, दिगंबर देसाई, मुलिक बुरुड, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यासह ठरावधारक उपस्थित होते.
.. ठराव धारकांच्या आकड्यांचा खेळ सुरू
चराटी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्यासोबत १०६ पैकी ५६ ठरावधारक आहेत. त्यामध्ये आणखीन ४ जणांची वाढ होणार आहे असे सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केलेले सुधिर देसाई यांच्या गटाकडून सोशल मीडियावर ५८ जणांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सध्या जिल्हा बँक निवडणूक माध्यमातून ठराव धारकांच्या आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. काल, गुरुवारी तब्बल १०८ अर्ज दाखल झाले होते. तर आतापर्यंत १९८ जणांनी २७४ अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.