Kdcc Bank Election : सत्ताधाऱ्यांचा विजयी पक्का...पण काहींना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 12:24 PM2022-01-06T12:24:58+5:302022-01-06T12:36:11+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहचलेली इर्षा पाहता काही गटात धक्कादायक निकाल लागणार आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहचलेली इर्षा पाहता काही गटात धक्कादायक निकाल लागणार आहे. सत्ताधारी आघाडीच्या विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत, उर्वरित काही जागा त्यांच्या पदरात पडणार असल्याने त्यांचा विजय पक्का आहे. मात्र काहींना धक्का बसणार हे निश्चित आहे. ‘शिरोळ’, ‘आजरा’ विकास संस्था गटासह पतसंस्था गट हे धक्कातंत्राचे केंद्रबिंदू असल्याची चर्चा बुधवारी मतदानानंतर जिल्ह्यात सुरू झाली आहे.
बँकेचीनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यापासूनच निकराचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकारणातून एकमेकांच्या उमेदवारीला झालेला विरोध, त्यात इच्छूकांच्या मांदियाळीने निवडणूक लागली. शेवटच्या टप्यात खासदार संजय मंडलिक यांनी सवतासुभा मांडत निवडणुकीत चांगलाच रंग आणला. पतसंस्था, दूध संस्था, प्रक्रियासह राखीव गटा अशा नऊ जागांवर त्यानी तगडे आव्हान निर्माण केले.
एकूण, सत्तारुढ आघाडीकडील मतांची आकडेवारी पाहिली तर सर्व गटातील जागा मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतात. मात्र तशी परिस्थिती राहिली नव्हती. सत्तारुढ आघाडीतील नेते एकत्र आले असले तरी ती त्यांची राजकीय अपरिहार्यता होती. त्याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. त्यातही नेत्यांमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने डोके वर काढल्याने अनेक गटातील निकाल धक्कादायक लागतील, असा चित्र मतदानानंतर दिसते.
प्रक्रिया गट - येथे सत्तारुढ आघाडीकडून मदन कारंडे व प्रदीप पाटील तर विरोधी आघाडीकडून संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यात लढत झाली. येथे पहिल्यापासूनच मंडलिक व आसुर्लेकरांची गटावर पकड राहिली. ४४८ पैकी २५० ते २७५ मते मिळतील असा दावाही मतदानानंतर दोघांनी केला आहे. मात्र एकूणच गटातील हवा पाहता मंडलिक, आसुर्लेकर बाजी मारणार असेच दिसते.
दूध संस्था गट - येथे सत्तारुढ आघाडीचे भैय्या माने व विरोधी आघाडीचे क्रांतीसिंह पवार-पाटील यांच्यात सरळ लढत झाली. माने हे ‘गाेकुळ’ निवडणुकीपासून मतदारांच्या संपर्कात होते. क्रांतीसिंह हे नवखे उमेदवार असले तरी त्यांनी लावलेल्या यंत्रणेने कमी वेळेत हवा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र माने यांच्यासाठी नेत्यांसह ‘गोकुळ’च्या माध्यमातून लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या तर त्यांचा विजय पक्का मानला जात आहे.
पतसंस्था, बँका - या गटात १२२१ मतदानात तिरंगी लढत झाली. विद्यमान संचालक अनिल पाटील, सत्तारूढ गटाकडून आमदार प्रकाश आवाडे व विरोधी आघाडीकडून अर्जुन आबीटकर यांच्यात अस्तित्वाची लढाई झाली. अनिल पाटील यांच्याकडे पतसंस्था केडरची ताकद होती. आवाडे यांंच्याकडे सत्तारूढ गटातील मतांची बेरीज तर आबीटकर यांच्याकडील जोडण्या होत्या. तिन्ही उमेदवारांनी केलेले निकराचे प्रयत्न, जिल्हा पातळीवरून झालेले हस्तक्षेप पाहता येथे धक्कादायक निकाल लागेल, अशीच हवा आहे.
क्रॉस व्होटिंगचा धोका
राखीव गटातील पाच जागांवरही अटीतटीची लढत झाली. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी राबविलेली यंत्रणा थेट मतदारांपर्यंत पाेहोचली होती. त्यामुळेच या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले आहे. त्यामुळे निकालानंतर दिग्गजांची झोप उडणार हे मात्र नक्की आहे.
विरोधी आघाडीची प्रचार
ऐनवेळी पॅनेल होऊन विरोधी आघाडीची प्रचार यंत्रणा प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सत्तारूढ आघाडीच्या काही उमेदवार पॅनेलच्या मतांच्या गठ्यावर अवलंबून राहिल्याचे दिसले.
विकास संस्था गट -
- आजरा येथे एक-दोन मतांची लढाई आहे. सुधीर देसाई यांनी लावलेल्या जोडण्या, मतदानाच्या रांगेत उभ्या केलेल्या मतदारांनी आत जाऊन देसाई यांनाच मतदान केले तर देसाई बाजी मारतील असे चित्र आहे.
- गडहिंग्लज येथे मतदारांमधील हवा पाहता संतोष पाटील यांच्या विजयात अडचण दिसत नाही.
- शिरोळ येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे ठरावांची बेरीज असली तरी गणपतराव पाटील यांच्यासाठी राजू शेट्टी यांनी खेळलेल्या खेळ्या यशस्वी झाल्या तर धक्कादायक निकाल अपेक्षित आहे.
- शाहूवाडीत रणवीर गायकवाड यांच्याकडे संख्याबळ अधिक होते, मात्र गेल्या वेळची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी जोडण्या लावल्या होत्या. त्या यशस्वी झाल्या तरच येथील निकाल बदलू शकतो.
- पन्हाळ्यात मताचे गणीत पाहता आमदार विनय कोरे यांचा विजयी पक्का आहे.
- भुदरगडमध्ये रणजीतसिंह पाटील यांच्याकडे ठरावधारकांची संख्या विरोधकांपेक्षा दुप्पट असल्याने येथे फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे.