kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:55 PM2021-12-03T17:55:16+5:302021-12-03T17:55:45+5:30
विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून मंत्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच गटातून त्यांचेच समर्थक महादेव पडवळ (मांडुकली पैकी खोपडेवाडी) व दीपक लाड (पळसंबे) यांचेच डमी अर्ज असल्याने पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यांचे विरोधक पी. जी. शिंदे यांनी या गटातील निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केल्याने पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.
आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मंत्री पाटील गटाचे समर्थक लक्ष ठेवून होते. पी. जी. शिंदे यांनी अर्ज दाखल न केल्याने मंत्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महादेव पडवळ व दीपक लाड यांच्या माघारीची औपचारिकता राहिली आहे. पी. जी. शिंदे हे शुक्रवारी अर्ज दाखल करण्यास येणार असल्याची चर्चा दिसवभर सुरू होती. त्यातच ते स्वत: व त्यांचे बंधू एकनाथ शिंदे दिवसभर बँक आवारात थांबून होते. मात्र त्यांनी अर्ज दाखल केलाच नाही.
गगनबावडा तालुका दुर्गम व वाड्या-वस्त्यांचा आहे. येथे संस्थांची संख्याही खूप कमी आहे. विकास संस्था गटात ६६ मतदार आहेत. एकवेळचा अपवाद वगळता या गटातून वीस वर्षे पी. जी. शिंदे प्रतिनिधीत्व करत आहेत. २००१ मध्ये सतेज पाटील यांनी या गटातून शिंदे यांचा पराभव करून बँकेच्या राजकारणात प्रवेश केला होता.