kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 11:17 AM2022-01-07T11:17:45+5:302022-01-07T11:24:57+5:30
नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.
सदाशिव मोरे
आजरा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजऱ्यातून सुधीर राजारामबापू देसाई ५७ मते घेऊन निवडून आले आहेत. तर विद्यमान संचालक अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली. मतदान वेळी रांगेतील मते व मिळालेली मते यामध्ये तफावत असल्याने फुटलेली मते व बाद मताचा शिलेदार कोण ? याची चर्चा आजरा तालुक्यात रंगली आहे. देसाई विजयी झाल्याचे वृत्त समजताच आजऱ्यात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
जिल्हा बँकेवर पंचवीस वर्षे राजारामबापू देसाई यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ता मिळविली होती. त्यावेळी ते बॅंकेचे उपाध्यक्षही झाले होते. दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राजारामबापू देसाई यांचा पराभव करीत काशिनाथअण्णा चराटी यांनी विजय मिळवला होता.
चालू वेळच्या निवडणुकीत या दोन नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत होती. त्यामध्ये सुधीर देसाई यांनी बाजी मारून आजऱ्यातून जिल्हा बँकेवर सत्ता मिळविली आहे. नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.
..फुटलेल्या व बाद मतांचा शिलेदार कोण?
मतदानादिवशी सुधीर देसाई यांच्या रांगेत ५५ तर अशोक चराटी यांच्या रांगेत ५१ मते होती. निकालात मात्र देसाई यांना ५७ व चराटी यांना ४८ मते व एक मत बाद झाले आहे. आर्थिक घडामोडी बरोबर नोकऱ्या व रांगेत उभा राहूनही ती फुटलेली तीन मते कोणाची व बाद मताचा शिलेदार कोण ?? याची चर्चा आजरा तालुक्यात रंगली आहे.