‘केडीसीसी’ सुनावणी पूर्ण; उद्या निकाल
By Admin | Published: February 16, 2015 10:31 PM2015-02-16T22:31:05+5:302015-02-16T23:09:21+5:30
कर्जवाटप प्रकरण : कर्जदार संस्थांची मालमत्ता असताना संचालकांवर कारवाई चुकीची; बचाव पक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) माजी संचालकांची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली. त्यावर बुधवारी (दि. १८) निकाल देण्यात येणार आहे. सहकारमंत्र्यांच्या निकालाकडे साऱ्या सहकारक्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. जिल्हा बँकेच्या माजी संचालकांनी विनातारण व अल्पतारण कर्जवाटप केल्याने बॅँकेला आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर १४७ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी १४७ कोटी वसूल करण्यासाठी १५ दिवसांची डेडलाईन दिली आहे. दराडे यांच्या कारवाईविरोधात माजी संचालकांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे याचिका दाखल केलेली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीत संचालकांच्या वकिलांनी सहनिबंधकांनी कारवाई चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगितले. थकबाकीदार संस्थांची मालमत्ता आहे, या संस्थांच्या संबंधित संचालकांची ही मालमत्ता असताना थेट बँकेच्या संचालकांवर कारवाई करणे योग्य नाही. त्याचबरोबर थकबाकीदार संस्थांपैकी बहुतांशी संस्थांची वसुली झालेली आहे, त्यामुळे इतर थकबाकीदार संस्थांची वसुली होऊ शकते; पण चौकशी अधिकाऱ्याने संचालकांना विश्वासात न घेता परस्पर बॅँकेतून पुरावे घेऊन कारवाई केलेली आहे. आम्हाला बचावाची संधीही दिलेली नाही, असा युक्तिवाद संचालकांच्या वकिलांनी केला. संचालकांचे म्हणणे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऐकून घेतले, यावर बुधवारी निकाल देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकांवर झालेली कारवाई ही सर्वांत मोठी असल्याने याकडे साऱ्या सहकारक्षेत्राचे लक्ष लागले आहे.