केडीसीसीची झेप : ६००० कोटी ठेवींचा टप्पा पार; ऐतिहासिक यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:05 PM2020-09-04T21:05:41+5:302020-09-04T21:06:49+5:30
देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे.
कोल्हापूर : देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे.
या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इतक्या चांगल्या ठेवी जमा होणे हा बँकेच्या व अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वासच आहे, अशा भावनाही यावेळी व्यक्त झाल्या.
बँकेने कर्मचाऱ्यांना कोविडसह, अपघाती मृत्यू, इतर व नैसर्गिक मृत्यूबद्दल विमासुरक्षा कवच लागू केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते अध्यक्ष मुश्रीफ यांचा सत्कार झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे. जोपर्यंत ठेवी वाढणार नाहीत, तोपर्यंत व्यवस्थापन खर्च कमी येणार नाही, या उद्देशाने मी हे ध्येय ठेवले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, अध्यक्ष मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडीच हजारांवरून दहा हजार रुपये केले. दैनिक वेतनावरील १०० कर्मचाऱ्यांना कायम केले. हक्काच्या रजेचा पगार सुरू केला. कर्मचाऱ्यांना नऊ टक्के बोनस दिला. ६४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली.
आता लक्ष्य १० हजार कोटी ठेवींचे
मुश्रीफ म्हणाले, मार्च २०२१ पर्यंत सात आणि मार्च २०२२ पर्यंत दहा हजार कोटी ठेवींचा टप्पा डोळ्यांसमोर ठेवूनच जिद्दीने काम करा. सभासदांचा विश्वास, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँक देशात एक नंबर येईल, याचा मला विश्वास आहे.