‘केडीसीसी’च्या ई-लॉबी, यूपीआय पेमेंट सेवांचा आज प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:45+5:302020-12-27T04:18:45+5:30
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (केडीसीसी) ई-लॉबी सुविधा इमारत भूमिपूजनासह यूपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम या सेवांचा आज, रविवारी दुपारी चार ...
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (केडीसीसी) ई-लॉबी सुविधा इमारत भूमिपूजनासह यूपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम या सेवांचा आज, रविवारी दुपारी चार वाजता बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मोबाईल व्हॅन लाँचिंग मुख्य महाप्रबंधक एल. एल. रावल यांच्या हस्ते व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक यांच्या उपस्थित होत आहे.
बँकेचे संचालक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, महादेवराव महाडिक, निवेदिता माने, आदींच्या उपस्थितीत या सेवांचा प्रारंभ होत असल्याची माहिती बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने व व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी दिली.
दुर्गम भागात ५०० मायक्रो ए. टी. एम.
बँक सीबीएस प्रणालीसह सीटीएस क्लिअरिंग, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., पी.एफ.एम.एस, एस.एम.एस., मोबाईल बँकिंग, आदी सुविधा देते. दुर्गम गावांमध्ये ५०० मायक्रो ए.टी.एम. सुरू होत असून, फोन पे, पेटीएम, गुगल पे यासारख्या ॲपच्या डिजिटल पेमेंटद्वारे खाते नंबर, आयएफएससी कोड माहीत नसतानाही ग्राहकांच्या फोन नंबरद्वारे रक्कम वर्ग करण्यासाठी यु.पी.आय. सुविधाही सुरू होत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
या कार्यक्रमापुर्वी दुपारी दोन वाजता बँकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना या योजनांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
फोटो : जिल्हा बँकेच्या ई- लॉबी प्रणाली सुविधेची ही नियोजित अद्ययावत इमारत. (फाेटो-२६१२२०२०-कोल- जिल्हा बँक)