लॉकडाऊनच्या काळात कृषीविषयक दुकाने सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:38+5:302021-05-15T04:22:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उद्या, रविवारपासून लागणाऱ्या आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनच्या काळात कृषीविषयक दुकाने व शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उद्या, रविवारपासून लागणाऱ्या आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनच्या काळात कृषीविषयक दुकाने व शेतकऱ्यांना शेतीकामासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत सवलत मिळावी, अशी मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनने जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर व समीर पाटील-कुंभोजकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे शुक्रवारी केली.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना कडक लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर इरिगेशन फेडरेशनने प्रत्यक्ष भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. पिकांना जमिनीला उन्हाळ्यात जादा पाणी लागते. उन्हाळ्यात एकाच वेळी सगळे शेतीपंप चालू होत असल्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त होते; त्यामुळे कृषिपंपांमध्ये अचानक बिघाड होत असतात; त्यासाठी विजेची साहित्य मिळणारी दुकाने व इतर शेतीविषयक साहित्य खरेदीची दुकाने चालू ठेवणे अत्यावश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेती अवजारे खरेदी करणे व शेतीच्या मशागतीसाठी सकाळच्या वेळेत परवानगी मिळावी; तसेच काही गावांतील शेतकरी राहतात एका गावात व जमीन दुसऱ्या गावात; त्यामुळे त्यांना शेतीला पाणी देणे व शेतकामांसाठी मुख्य रस्त्याने जावे लागणार आहे; पण कडक लाॅकडाऊनमुळे त्यांना आपल्या शेतात जाण्यास अडचणीचे होणार आहे; त्यामुळे जिल्हाअंतर्गत शेतीमशागत व वरील शेतीविषयक साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुभा असावी, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
फोटो: १४०५२०२१-कोल-इरिगेशन