गृह अलगीकरणावर करडी नजर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:44+5:302021-05-22T04:21:44+5:30
कोल्हापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गृह अलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांवर तसेच स्वॅब दिलेल्या संशयितांवर करडी नजर ठेवा. ...
कोल्हापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गृह अलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांवर तसेच स्वॅब दिलेल्या संशयितांवर करडी नजर ठेवा. दिवसातून दोनवेळा त्यांची ऑक्सिजन पातळी तपासा, अशा सक्त सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व संबंधितांना दिल्या.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी यांच्याशी प्रशासक बलकवडे यांनी आयुक्त कार्यालय येथून दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करून आढावा घेतला. यावेळी प्रशासकांनी काही अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतल्याचे समजते.
गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांवर दैनंदिन वैद्यकीय अधिकारी व सचिवांनी लक्ष ठेवावे, गृह अलगीकरण करताना शासनाच्या निकषात बसतात, त्यांनाच परवानगी द्या. अशा नागरिकांची दिवसातून दोनवेळा ऑक्सिजन लेव्हल व वॉक टेस्ट केली जाते की नाही, याचे वैद्यकीय पथकाने मॉनिटरिंग दैनंदिन करावे. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत ते गृह अलगीकरणात राहतील, याची दक्षता उपशहर अभियंता व सचिवांनी घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासगी रुग्णालयाच्या देखरेखीखाली जे घरी उपचार घेत आहेत, अशांवर लक्ष ठेवा. खासगी रुग्णालयातील व्याधीग्रस्त नागरिकांना गृह अलगीकरण न करण्याबाबत संबंधित हॉस्पिटलला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. सचिवांनी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगकामी मदत करून गृह अलगीकरणातील नागरिकांवर लक्ष ठेवावे. प्रभागात सचिवांनी दक्ष राहून काम करावे. आपल्या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर कार्यरत राहून त्यांना स्थलांतरित करण्यास मदत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, शहर अभियंता नारायण भोसले, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व वैद्यकीय अधिकारी, समन्वय अधिकारी यांनी बैठकीत सहभाग घेतला.
‘लोकमत’मधील वृत्ताचा प्रभाव -
गुरुवारी प्रसिध्द झालेल्या ‘लोकमत’च्या अंकात शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचा दावा केला होता. या वृत्ताचे पडसाद प्रशासकांच्या बैठकीत उमटले. ‘लोकमत’मधील सर्व मुद्यांवर आधारित त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी एक दोन अधिकाऱ्यांचा त्यांनी समाचारही घेतला.