कोरोनाबाधितांना संस्थात्मक अलगीकरणातच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:15+5:302021-05-27T04:25:15+5:30
गडहिंग्लज : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवल्यामुळेच संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाबाधित रुग्णांना गृह ...
गडहिंग्लज : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवल्यामुळेच संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणात न ठेवता संस्थात्मक अलगीकरणातच ठेवा, अशा सूचना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. गावा-गावात बाधितांची संख्या वाढली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रारंभी कोविड केंद्रांत सर्वांना दाखल करून घेणे शक्य नव्हते. त्यासाठी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहअलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु त्यावर नियंत्रण नसल्याने निदर्शनास आले आहे.
गावपातळीवर कोरोनाचा आढावा घेताना रुग्णांना अद्याप गृह अलगीकरणात ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून गेल्या दोन दिवसांत आढळून आलेल्या बाधितांना वैद्यकीय सल्ल्याने तातडीने संस्थात्मक अलगीकरण करावे. त्यात कोणताही कसूर झाल्यास गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल.
अपवादात्मक परिस्थितीवगळता संस्थात्मक अलगीकरणात जाण्यास तयार नसलेल्यांना कोविड केंद्रात दाखल करण्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत घ्या. याबाबत ग्रामदक्षता समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नियंत्रण अधिकारी व ग्रामस्तरीय समन्वय अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना देऊन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.