कोल्हापूरचा फुटबॉल अखंड ठेवणार

By admin | Published: May 1, 2015 12:30 AM2015-05-01T00:30:02+5:302015-05-01T00:31:05+5:30

सर्व संघांची ग्वाही : यापुढेही फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणार : गणी आजरेकर

To keep the football of Kolhapur intact | कोल्हापूरचा फुटबॉल अखंड ठेवणार

कोल्हापूरचा फुटबॉल अखंड ठेवणार

Next

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलला महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एक वेगळी ओळख आहे. त्याच खेळाच्या जोरावर अनेक खेळाडूंचे आयुष्य घडले आणि घडत आहे. अशी संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या या खेळाच्या विकासासाठी सर्व संघांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची ग्वाही कोल्हापुरातील सर्व फुटबॉल संघांनी गुरुवारी दिली. मुस्लिम बोर्डिंग येथे मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवासराव साळोखे यांनी ही माहिती दिली.
साळोखे म्हणाले, संस्थानकाळापासून कोल्हापूरचा फुटबॉल सर्वश्रूत आहे. ही परंपरा केवळ एका स्पर्धेत झालेल्या हाणामारीमुळे जर बंद पडणार असेल तर ती बंद पडू देता कामा नये. याकरीता सर्व फुटबॉल संघांनी आपल्या खेळाडूंना शिस्त लावली पाहिजे. पुढच्या स्पर्धा व्हाव्यात. फुटबॉल स्पर्धांची व खेळाची परंपरा बंद होऊ नये याकरीता सर्वांनी एकत्रित येऊन निर्धार केला पाहिजे, असे आवाहन सर्व उपस्थित संघांच्या प्रतिनिधींना केला. त्यावर सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत खेळाडूंना शिस्त व झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही व कोल्हापूरचा फुटबॉल खेळ अखंडित राहणार असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, आपण केवळ कोल्हापूरचा फुटबॉलचा विकास व्हावा, या उद्देशाने दरवर्षी फुटबॉल स्पर्धा भरवितो. त्यात यंदा अंतिम सामन्यात दोन संघांच्या समर्थकांत हाणामारी झाली. संघाच्या समर्थकांबरोबरच संयोजक म्हणून मलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत पोलिसांनी अपमानजनक वागणूक दिली तरीही पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक जोमाने स्पर्धा भरवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.


छावा संघटनेतर्फे निषेध
फुटबॉल स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यात झालेल्या मारामारीप्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने एका पत्रकाद्वारे केली आहे. याचबरोबर या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे. शाहू स्टेडियम येथे फुटबॉलच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियम व स्टेडियमबाहेरही मारामारी केली. यामध्ये सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर काही वाहनांवर दगडफेक केली. तसेच एक महिला व मुलगी जखमी झाली. अशा प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने एका पत्रकाद्वारे केली.



पोलिसांनी सूडबुद्धीतून केलेल्या कारवाईच्या चौकशीची मागणी
कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याने फुटबॉल स्पर्धेच्या परवानगीची दखल घेतली नाही; त्यामुळे थेट जिल्हा पोलीसप्रमुखांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्याचा राग मनात धरून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी मुस्लिम बोर्डिंग फुटबॉल चषक स्पर्धेच्या आयोजकांवर सूडबुद्धीने कारवाई केली आहे. या कारवाईची सखोल चौकशी करून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे गुरुवारी केली.
दरम्यान, पोलीस महानिरीक्षक वर्मा यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना तातडीने कार्यालयात बोलावून घेत या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रसंगी प्रशासक कादर मलबारी, संचालक हमसेखान शिंदी, हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, हाजी मुसा पटवेगार, अय्याज बागवान, निसार पठाण, मुस्ताक मुजावर, समीर मुजावर, फिरोज बागवान, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: To keep the football of Kolhapur intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.