देशाची अखंडता कायम राहो : नाताळनिमित्त ख्रिस्तीबांधवांची विशेष प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:10 AM2019-12-26T01:10:32+5:302019-12-26T01:12:45+5:30
शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलीस्टस चर्च, आॅल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च यांसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली.
कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करत व विविध सामाजिक उपक्रम राबवत नाताळचा सण ख्रिस्तीबांधवांनी बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.
कॅरोल गायनाची रात्रभर सुरू असलेली धूम, शहरातील विविध चर्चवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध कार्यक्रमांची रेलचेल, नवनवीन वस्त्रे परिधान करून प्रार्थनेसाठी आलेले ख्रिस्तीबांधव एकमेकांना देत असलेल्या शुभेच्छा अशा भारावलेल्या वातावरणात चर्च आणि परिसरात जोशपूर्ण व उत्साही वातावरणात प्रभू येशूचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलीस्टस चर्च, आॅल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च यांसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली.
न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये इंग्रजी व मराठी अशा दोन्ही उपासनेवेळी रेव्हरंड डी. बी. समुद्रे, रेव्हरंड जे. ए. हिरवे , रेव्हरंड सिनाय काळे यांनी नाताळचा संदेश दिला. दिवसभरात जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये सकाळपासूनच ख्रिस्तीबांधवांची गर्दी होती. नवी वस्त्रे परिधान करून आलेल्या आबालवृद्धांचा उत्साह यावेळी दिसून येत होता. हा उत्साहाचा झरा आठवडाभर सुरू राहणार आहे.
- विविध कार्यक्रमांची रेलचेल
नाताळनंतरही विविध ठिकाणी उपासना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज, गुरुवारी बाचणी, देवाळे येथे तर, उद्या, शुक्रवारी कुडित्रे, कोपार्डे, घरपण व शनिवारी (दि. २८) बालिंगा, पाडळी, खुपिरे या ठिकाणी ख्रिस्त जन्मदिन उपासना होणार आहे. रविवारी (दि. २९) दिवसभर वायल्डर मेमोरियल चर्च येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. ३०) शिरोली, लक्षतीर्थ, शिंगणापूर, तर मंगळवारी (दि. ३१) मौजे वडगाव येथे ख्रिस्तजन्म उपासना आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रात्री नऊ वाजता प्रभुभोजन व बुधवारी (दि. १ जानेवारी) नववर्षाच्या पहिल्या दिवशी नववर्ष उपासना आयोजित करण्यात आली आहे.
- प्रभु येशूजन्माचे देखावे
बेथलहेम शहरात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका गाईच्या गोठ्यात झाला. ‘येशू जन्म’ हा देखावा प्रत्येक चर्चसमोर व सर्वच ख्रिस्ती वसाहतींमध्ये करण्यात आला होता; तर विशेष चांदण्याही लावण्यात आल्या होत्या.
- शहरही फुलले : नाताळनिमित्त सुट्टी व पर्यटकांचा हंगाम यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, नृसिंहवाडी, न्यू पॅलेस, रंकाळा, आदी परिसरांत पर्यटकांनी दिवसभर गर्दी केली होती. विशेषत: बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, शिवाजी चौक, चप्पल लेन, आदी ठिकाणी पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्ये दिसत होते. यासोबतच विविध केकशॉपमध्येही विविध प्रकारचे केक, डोनेट खरेदीसाठीही गर्दी होती. यासोबतच ख्रिस्ती बांधवांसोबत अन्यधर्मियांच्या घरीही नाताळ सणाची खास सजावट करण्यात आली होती.