ज्ञानासाठी जिज्ञासावृत्ती जागृत ठेवा:विलास पाटील - ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:02 AM2017-12-13T01:02:45+5:302017-12-13T01:03:56+5:30
कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे
कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्यातील जिज्ञासावृत्ती जागृत करा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.
शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहारहोते.
डॉ. पाटील म्हणाले, आजच्या युगात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संपत्तीपेक्षा विद्वत्तेला सलाम केला जातो. विज्ञानामुळे माणूस जवळ आला; पण माणूसपण दूर गेले आहे. त्यामुळे विज्ञानाला धर्माची जोड देणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंत:प्रेरणा जागृत करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या मनात सतत नवीन शिकण्याचा ध्यास असला पाहिजे. अंत:प्रेरणा जागी झाली तरच योग्य शोध लागतील.
यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा ‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील १३५, तर माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश आहे. तसेच शिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभाग आहे. सौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणे यामध्ये मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १४)पर्यंत खुले राहणार आहे.
भक्ती फट्टे, रुपाली नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर एस. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली सावंत यांनी आभार मानले.
यावेळी गुजराती मित्र मंडळाचे चेअरमन जसवंतभाई शहा, विज्ञान समितीचे अध्यक्ष एम. एस. शिंदे, विज्ञान समिती सचिव प्रकाश सुतार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा प्रदर्शनाचा विषय
कोल्हापूर शहरातील विविध प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून १३५, तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून १३० उपकरणांचा समावेश
शिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभागसौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणे
कोल्हापुरातील शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे मंगळवारी ४३ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश सुतार, आर. व्ही. कांबळे, दीपाली सावंत, एस. एस. म्हातुगडे, एम. एस. शिंदे उपस्थित होते.