आमिषाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ रहा
By admin | Published: November 7, 2015 12:11 AM2015-11-07T00:11:11+5:302015-11-07T00:15:27+5:30
राष्ट्रवादीची बैठक : मुश्रीफ यांच्या सक्त सूचना
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या १५ नगरसेवकांनी कोणाच्याही आमिषाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहावे, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत केले. ‘ताराराणी’कडून कॉँग्रेस नगरसेवकांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटात पसरल्यानंतर तातडीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक गुरुवारी बोलाविण्यात आली.
या बैठकीला माजी मंत्री हसन मुश्रीफ, प्रा. जयंत पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदी उपस्थित होते. पक्षाच्या चिन्हावर निवडून आला असल्याने पक्षाशी एकनिष्ठ राहा, असे आवाहन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादीने कॉँग्रेस पक्षासोबत आघाडी केली असून, पुढच्या पाच वर्षांत सर्वच्या सर्व १५ नगरसेवकांना पदे मिळणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. भाजप-ताराराणीचे कोणी भेटायला आले तर आम्हाला कळवा. त्यांच्याकडून नगरसेवकांना फोडाफोडीचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. दक्ष राहा, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.
जनतेचा कौल मान्य करा : पाटील
कॉँग्रेस व राष्ट्रवादीला स्पष्टपणे बहुमत मिळाले असतानाही महापौरपदासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील एवढा अट्टहास का करीत आहेत? तुम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करणार की नाही? असे सवाल कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत. नगरसेवकांना फोडणे म्हणजेच घोडेबाजार आहे. कोल्हापूरच्या जनतेला जे नको होते, तेच पालकमंत्री करताना दिसत आहेत. दिवाळीच्या दिवसांत जनतेला भेटायचे सोडून ते अज्ञातवासात जातात. त्यांचा हा प्रयत्न जनतेचा अपमान आहे, असे पाटील म्हणाले.
ताराराणी-काँग्रेस समर्थकांचा पाठलाग
गेल्या दोन दिवसांत ताराराणी आघाडीतील ‘एस फाइव्ह’ सदस्यांनी कॉँग्रेसच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन बोलणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. ज्या नगरसेवकांच्या घरी ताराराणीचे सदस्य जातील त्याच्या पुढच्या काही मिनिटांत कॉँग्रेसचे समर्थक पोहोचत होते. गुरुवारी दिवसभर हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. याचवेळी कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील कोल्हापुरात नव्हते. त्यांनी शुक्रवारी कोल्हापुरात येताच या प्रकाराचा आढावा घेतला.