Lok Sabha Election 2019 पवारसाहेब, २००९ ची लढत ‘ध्यानात’ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:05 AM2019-04-18T01:05:12+5:302019-04-18T01:05:31+5:30
सांगरूळ : ‘मी बी ध्यानात ठेवलंय’ म्हणून आम्हाला धमकी देणाऱ्या शरद पवार यांनी सन २००९ ची लोकसभेची निवडणूक ‘ध्यानात’ ...
सांगरूळ : ‘मी बी ध्यानात ठेवलंय’ म्हणून आम्हाला धमकी देणाऱ्या शरद पवार यांनी सन २००९ ची लोकसभेची निवडणूक ‘ध्यानात’ ठेवावी, असा पलटवार शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केला. सत्तेची पदे घरात ठेवण्यासाठी सर्वपक्षीय खिचडी शिजवणाºया महाडिकांना धडा शिकवण्याचा विडा कोल्हापूरच्या जनतेने उचलल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगरूळ (ता. करवीर) येथे बुधवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे होते. सभेला लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडलिक म्हणाले, गाय दुधाच्या दरासाठी आमदार चंद्रदीप नरके रस्त्यावर उतरले असताना हे खासदार महाशय दुधाला दर मिळू नये, या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सभा घेत होते.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ५६ पक्षांच्या आघाडीपेक्षा ५६ इंचांची छाती असणारे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आमच्याकडे आहे. मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी साखरेचे किमान दर ३१०० रुपये करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. एफआरपी देण्यासाठी सॉफ्टलोन देऊन खºया अर्थाने साखर उद्योग सावरला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून, आता महाडिकांसाठी सारं आभाळच फाटल्याने ठिगळं कुठं लावायचं हेच समजत नाही. ‘गोकुळ’च्या सभेत नाचणाºया चंद्रदीप नरके यांचा विधानसभेत पराभव करतो म्हणणाºया महादेवराव महाडिक यांना कोल्हापूर म्हणजे जहागीरदारी वाटते काय? कामाच्या शिदोरीवर चंद्रदीप नरके विधानसभेला हॅट्ट्रिक करतील. हंबीरराव पाटील-हळदीकर, मंजित माने, देवराज नरके, बाजीराव शेलार, निवास वातकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘कुंभी’ बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीनाथ खाडे, दिलीप खाडे, प्रकाश पाटील, उत्तम वरुटे, अनिता पाटील, नंदकुमार पोवार आदी उपस्थित होते. सरपंच सदाशिव खाडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष वातकर यांनी स्वागत केले. अनिल घराळ यांनी आभार मानले.
मैत्री व दुश्मनी ‘सतेज’ यांच्याकडून शिकावी
सतेज पाटील यांच्याशी मैत्री
करून महाडिक खासदार झाले;
पण सहाच महिन्यांत पाटील
यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता या निवडणुकीत
‘आमचं ठरलंय’ असे सांगत
महाडिक यांना रोख-ठोक विरोध केला आहे. सतेज पाटील यांच्याकडून मैत्री आणि दुश्मनी
कशी करावी हे शिकावे, असे मंडलिक यांनी सांगताच एकच जल्लोष करण्यात आला.
वाघाला ‘उंदरा’चा सापळा कसा चालेल?
खासदारकी गेल्यानंतर घरातील सर्वच पदे जाणार, या भीतीपोटी महादेवराव महाडिक यांनी चंद्रदीप नरके यांना संपविण्याची भाषा केली; पण नरके हे वाघ आहेत, त्यांना पकडण्यासाठी महाडिक यांनी उंदराचा सापळा लावला असून त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.