साताऱ्यातील संग्रहालय जपतेय ऐतिहासिक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 11:12 PM2017-05-17T23:12:23+5:302017-05-17T23:12:23+5:30
साताऱ्यातील संग्रहालय जपतेय ऐतिहासिक ठेवा
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रत्येक शहराला, प्रांताला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्या-त्या भागातील संस्कृती, इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा, यासाठी संग्रहालयांची उभारणी करण्यात आली. साताऱ्यात असलेल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाला त्यामध्ये जतन करण्यात आलेल्या वस्तूंमुळे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेला ठेवा व इतिहासाची माहिती देण्याचे काम संग्रहालयामार्फत कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
ऐतिहासिक वस्तूंच्या ठेव्याचा संग्रह करण्याचे आलय म्हणजे संग्रहालय. याच संकल्पनेनुसार पुरातन नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन चित्रे आदी वास्तूंचे जतन करण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी संग्रहालयातही इतिहासकालीन अनेक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. या संग्रहालयाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. यामध्ये चार विभाग असून, यामध्ये शस्त्र, अभिलेख, चित्र व वस्त्र विभाग असे चार वेगवेगळे विभाग आहेत. तर दुसरा मराठा आर्ट गॅलरी विभाग आहे.
संग्रहालयात असलेल्या अनेक वस्तू आज इतिहासाची साक्ष देत असल्या तरी या संग्रहालयांना भेटी देण्याचे प्रमाण नगण्य आहे. संग्रहालय ही संकल्पना जतन करण्यासाठी शासनाच्या वतीने १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जात आहे.
यानिमित्त साताऱ्यासह औंध येथील भवानी संग्रहालय सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. जुन्या संग्रहालयाची जागा अपुरी असल्याने शहरातील हजेरी माळ येथे ३० गुंठे क्षेत्रात नव्या संग्रहालयाची उभारणी केली जात आहे. प्रत्येकाने संग्रहालयांना भेट दिली, तरच संग्रहालय संकल्पनेचे जतन होईल
.राघोबादादांनी रोवला अटकेपार झेंडा !
इ. स. १७५२ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी घटना घडली. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात आलेल्या अटकेपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तेथे रोवला. ही घटना मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानली जाते. राघोबादादांनी केलेल्या या पराक्रमावर ‘अटकेपार झेंडा रोवणे’ ही म्हण प्रचलित झाली. याच रघुनाथराव म्हणजे राघोबादादा यांची तलवार संग्रहालयात आहे. तलवारीवर सुवर्णाक्षरात ‘रघुुनाथराव’ असे लिहिले आहे.
भिंती कापून आणली ‘भित्तिचित्रे’
शिवाजी संग्रहालय १३ जानेवारी १९७० मध्ये नागरिकांसाठी खुले झाले. या संग्रहालयात जतन करण्यात आलेल्या भित्तिचित्रांना विशेष महत्त्व असून, त्याला कारणही तसेच आहे. जयराम स्वामींचे वडगाव येथील मठात असलेली भित्तिचित्रे भिंती कापून सुरक्षित काढण्यात आली व त्यांचे साताऱ्यातील संग्रहालयात जतन करण्यात आले. अशा प्रकारे भित्तिचित्रे जतनीकरणाचा भारतातील हा पहिलाच प्रयोग असावा. याचे श्रेय प. ना. पोतदार, मधुकर इनामदार व तत्कालीन सहायक अभिरक्षक मधुकर इनामदार यांना जाते.
‘जिज्ञासा’कडून
आज अभ्यास सहल
गेल्या काही वर्षांपासून जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या पुढाकाराने १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साताऱ्यात देखील साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.