चित्र, चरित्रातून सांस्कृतिक ठेवा - किरण शांताराम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:27 AM2019-05-05T04:27:32+5:302019-05-05T04:27:48+5:30
भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने मोलाचे योगदान दिले आहे. याच मातीतले नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मचरित्रातून नाट्य आणि सिनेसृष्टीचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.
कोल्हापूर - भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने मोलाचे योगदान दिले आहे. याच मातीतले नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मचरित्रातून नाट्य आणि सिनेसृष्टीचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. त्याच्या पुनर्प्रकाशनाद्वारे हा ठेवा नव्या पिढीसाठी उपलब्ध झाला आहे, असे मत ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम यांनी शनिवारी व्यक्त केले.
गेली अनेक वर्षे आऊट आॅफ प्रिंट असलेल्या या पुस्तकाचे चित्रपती व्ही. शांताराम फौंडेशनने पुनर्मुद्रण केले आहे. या पुस्तकाचे शनिवारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये व्ही. शांताराम फौंडेशन, पेंढारकर कुटुंबीय व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने प्रकाशन करण्यात आले. राम देशपांडे म्हणाले, या आत्मचरित्राला लेखनिक म्हणून काम करताना मला बाबूराव पेंढारकर यांचा सहवास लाभला. लेखनाचा निर्णय झाला तेव्हा मी एक रुपयाही घेणार नाही असे सांगितले; मात्र त्यांनी स्वत:हून मला एक तासाला ५ रुपये आणि रजा असेल तेव्हा अडीच रुपये असे मानधन ठरवले. सकाळी आठ ते दुपारी एक आणि दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे काम चालायचे. या काळात ते कोणाचीही भेट घेत नसत. अत्यंत शिस्तप्रधान अशी त्यांची जीवनशैली होती.
टोपीतून वडिलांचा आशीर्वाद
वडील व्ही. शांताराम यांची आठवण सांगताना किरण शांताराम म्हणाले, मी कधीही टोपी वापरत नाही. किंबहुना ते आवडत नसे; पण अण्णा आजारी पडले तेव्हा त्यांनी मला ‘तू कोणत्याही चांगल्या कामाला अथवा समारंभाला जाशील तेव्हा माझी टोपी घालावीस अशी माझी इच्छा आहे,’ असे सांगितले. मी याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, या टोपीच्या रूपाने माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहील. या घटनेनंतर मी टोपी घालायला सुरुवात केली.