नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी केली 'ही' मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं निवेदन
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 19, 2022 05:44 PM2022-09-19T17:44:27+5:302022-09-19T18:21:38+5:30
मंत्री पाटील यांनी आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू असे आश्वासन दिले.
कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिराला जोडणारे महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, गुजरी, ताराबाई रोड हे रस्ते दुचाकी व रिक्षा या वाहनांसाठी खुले ठेवावेत अशी मागणी महाद्वार व्यापारी असोसिएशन व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. यावेळी मंत्री पाटील यांनी आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू असे आश्वासन दिले. अध्यक्ष किरण नकाते, राजेश राठोड यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले.
अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होणार असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गेल्यावर्षी बॅरिकेडस लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. महापूर आणि कोरोनामुळे तीन वर्षे व्यावसायिकांना तोटा झाला आहे. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रौत्सव साजरा होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही त्यांच्या व स्थानिकांच्या सोयीसाठी परिसरात दुचाकी व रिक्षा येऊ देणे गरजेचे आहे.
सरसकट वाहन बंदी केल्याने व्यावसायिकांसह सगळ्यांनाच मनस्ताप होतो. त्यामुळे भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड, महाद्वार रोड, जोतिबा रोड, नवीन बाबूजमाल रोड, भेंडे गल्ली, गुजरी, राजोपाध्ये बोळ हो रस्ते बॅरेकेडिंग न लावता खूले ठेवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, महाद्वार व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंतभाई गोयानी, उपाध्यक्ष मनोज बहिरशेठ, प्रशांत मेहता, सत्यजित सांगावकर, अमित केसवानी, कवण छेडा, नजीर देसाई यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.