औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 12:50 AM2016-09-21T00:50:01+5:302016-09-21T00:53:29+5:30

उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : कॉरिडॉरप्रश्नी उद्योगमंत्र्यांसमवेत आज बैठक होणार

Keep the seats reserved for the industrial sector | औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा

औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा

Next

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर इकॉनॉमिक कॉरिडॉरसह जिल्ह्यातील उद्योगाच्या विकासासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा, अशी मागणी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून केले जाईल. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित करावयाच्या जागानिश्चितीसाठी उद्योजक व राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या समावेशासाठी आवश्यक जागेची उपलब्धता आणि प्रादेशिक विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवण्याबाबत उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेतली. यात प्रारंभी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. कॉरिडॉरसाठी आवश्यक असणारे विमानतळ, रेल्वेमार्ग, पोर्ट, गॅसवाहिनी, आदी सुविधांची उपलब्धता अधिक शक्य असतानाही यातून कोल्हापूरला डावलले आहे. ते येथील विकासाला मारक ठरणार आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून जिल्ह्णात विविध मोठे उद्योग येऊ शकतात. ते लक्षात घेऊन प्रादेशिक विकास आराखड्यात किमान दोन हजार हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित करताना शक्यतो पडजमिनींचा विचार करावा. यावर जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये बारा इंडस्ट्रिअल हब तयार केले जाणार आहेत. त्याच धर्तीवर मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्येदेखील हब होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात जागा आरक्षित ठेवण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. आरक्षित ठेवण्यासाठीच्या जागांची निश्चिती उद्योजक व औद्योगिक विकास महामंडळाने करावी.
यात शक्यतो शासकीय जागांचा विचार करावा. जागा निश्चित करून त्या आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करावी. विकास आराखड्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर असली, तरी यात चार महिन्यांमध्ये काही सुधारणा करता येतात.
या शिष्टमंडळात ‘गोशिमा’चे अध्यक्ष जे. आर. मोटवाणी, माजी अध्यक्ष अजित आजरी, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, ‘स्मॅक’चे सचिन पाटील, दीपक पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कणेरी मठ, रामलिंग परिसरातील जागेची पाहणी
कॉरिडॉर व भविष्यातील उद्योगांच्या विकासासाठी साधारणत: दोन हजार हेक्टरच्या दोन भूखंडांची गरज आहे. या दृष्टीने प्राथमिक स्वरूपात आम्ही कणेरी मठ व रामलिंग परिसरातील जागांची पाहणी केली असल्याचे ‘स्मॅक’चे अध्यक्ष जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासह प्रादेशिक विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध उद्योजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Keep the seats reserved for the industrial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.