इचलकरंजीला परवानगी मिळेपर्यंत दुकाने बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:45+5:302021-07-07T04:29:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर शहरातील इतर व्यवसायास शासनाच्या निर्बंधांतील नियमानुसार परवानगी मिळाली आहे; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर शहरातील इतर व्यवसायास शासनाच्या निर्बंधांतील नियमानुसार परवानगी मिळाली आहे; परंतु इचलकरंजी शहरातील दुकाने उघडण्यासंदर्भात अद्याप परवानगी नाही. यासंदर्भात शासनाकडून निर्णय होईपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.
येथील रोटरी क्लबच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत व्यापाऱ्यांनी मागणी व समस्या मांडल्या. त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे इतर व्यावसायिकांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर दुकान भाडे, कामगार पगार, वीज बिल याचा खर्च सुरूच आहे. त्यामुळे नियम व अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, यासाठी व्यावसायिकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती; परंतु फक्त कोल्हापूर शहराला परवानगी मिळाली. मग इचलकरंजी शहरावर अन्याय का, असा सवाल उपस्थित केला.
बलकवडे म्हणाले, शासनाने राज्यामध्ये काही जिल्ह्यांसाठी तेथील कोरोना पॉझिटिव्हचा दर बघून त्यानुसार शिथिलता दिली आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर व इचलकरंजी शहराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यावर स्वतंत्र युनिट म्हणून कोल्हापूरला परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर इचलकरंजीला परवानगी मिळावी, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, आदींसह पोलीस अधिकारी, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो ओळी
०५०७२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी उपस्थित होते.
छाया-उत्तम पाटील