२२ तास तणावसदृष्य वातावरणात पोलीसांनी दिला खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:40 PM2017-09-06T14:40:19+5:302017-09-06T14:41:14+5:30
डॉल्बी विरहीत गणेश विसर्जन मिरवणुक पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मेहनत घेतली. मंडळे, तालमीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून प्रबोधन केले. काही लोकप्रतिनिधींसह मंडळांनी डॉल्बी वाजविण्यासाठी टाकलेला दबाव झिडकारीत कोल्हापूर पोलीसांनी तब्बल २२ तास खडा पहारा देत मिरवणुकीचे नियोजन केले.
कोल्हापूर : डॉल्बी विरहीत गणेश विसर्जन मिरवणुक पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मेहनत घेतली. मंडळे, तालमीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून प्रबोधन केले. काही लोकप्रतिनिधींसह मंडळांनी डॉल्बी वाजविण्यासाठी टाकलेला दबाव झिडकारीत कोल्हापूर पोलीसांनी तब्बल २२ तास खडा पहारा देत मिरवणुकीचे नियोजन केले. मिरवणुक मार्गावर तणावसदृष्य परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडली.
आमदार राजेश क्षीरसागर व काही मंडळांनी डॉल्बी लावणारचं अशी भूमिका घेतल्याने यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पोलीस प्रशासनासाठी आव्हानात्मक होती. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी डॉल्बी विरहीत गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी गेल्या दोन महिन्यापासून परिश्रम घेतले. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले. मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला डॉल्बी वितरकांची गोडावून सिल करुन तब्बल २२ डॉल्बी व मिक्सर जप्त केली होती.
कोल्हापूर शहरात मंगळवारी सकाळी आठपासून ३ हजार, तर इचलकरंजीमध्ये दीड हजार पोलीस कर्मचारी मिरवणूक मार्गावर तैनात केले. विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा हे मिरवणूक संपेपर्यंत लक्ष ठेवून होते. पारंपारिक ढोल, ताषांच्या वाद्यावर मंडळाचे कार्यकर्ते जल्लोष करीत पुढे सरकत होते. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी परिसरात दिवस-रात्र तणावसदृष्य परिस्थिती होती.
डॉल्बी लागतो का? याची उत्सुक्ता संपूर्ण राज्याला लागून होती. पोलीसही बारकाईने मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. शेवटपर्यंत पोलीसांची धाकदूख सुरु असल्याचे स्पष्ट दिसत होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेवटच्या गणेशमूर्तीची मिरवणूक पापाची तिकटी येथे आली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर परिसरात बंदोबस्त करणारे पोलीसही याठिकाणी आले. महापालिकेचे सहायक आयुक्त संजय भोसले यांच्या हस्ते मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती करण्यात आली.
मद्यपींची संख्या कमी
दरवर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत ४० टक्के मंडळाचे कार्यकर्ते मद्यपान करून नशेत असतात. नशेमध्ये ते रस्त्यावर नंगानाच करतात. अवती-भोवती असलेल्या गणेशभक्तांची तमा त्यांना नसते. काहीजण मद्यपान करून हुल्लडबाजीपणा करतात. गर्दीचा फायदा घेत तरुणी व महिलांची छेड काढतात. त्यामुळे यंदा पोलिस प्रशासनाने मद्यपींना लक्ष केले होते.
मिरवणुकीत मद्यपान करून फिरत असताना संशय आल्यास त्याची ब्रेथ अॅनालायझर मशिनने तपासणी केली जात होती. मिरवणूक मार्गावर संवेदनशील ठिकाणी १९ विशेष कर्मचारी लक्ष ठेवून होते. यंदा कारवाईचा धाक आणि डॉल्बी विरहीत मिरवणुकीमुळे मद्यपींची संख्या घटली असल्याचे दिसून आले.
गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडल्याबद्दल कोल्हापूरकरांचे मी विशेष आभार मानतो. मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये, हा मुख्य उद्देश पोलीस प्रशासनाचा होता. त्यामध्ये आम्ही सफल झालो.
- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक