घरी राहून केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:28+5:302021-05-01T04:21:28+5:30
कोल्हापूर : कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला, तर सर्वांची धावपळ होते. पण, सम्राटनगरमधील सरनाईक माळ येथील प्राध्यापक सयाजी ...
कोल्हापूर : कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला, तर सर्वांची धावपळ होते. पण, सम्राटनगरमधील सरनाईक माळ येथील प्राध्यापक सयाजी पाटील यांच्या कुटुंबांतील सर्व पाचजण पॉझिटिव्ह आले. या परिस्थितीला सकारात्मकतेने आणि धैर्याने सामोरे जात योग्य उपचार, पुरेशी विश्रांतीच्या जोरावर तिघांनी घरीच राहून, तर दोघांनी दवाखान्यात उपचार घेऊन कोरोनावर मात केली.
प्रा. पाटील आणि त्यांच्या ६९ वर्षीय आई नीलांबरी यांना गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कणकण जाणवू लागली. त्यांनी औषधे घेतली. पण, त्यांच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. त्यावर दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी प्रा. पाटील यांनी आपल्यासह आई नीलांबरी, ७३ वर्षीय वडील बाळासाहेब आणि पत्नी सोनाली, साडेचार वर्षांची मुलगी रमा यांचे स्वॅॅब तपासणीसाठी दिले. सायंकाळी त्यांचे सर्वांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. एचआरसीटी चाचणी केल्यानंतर त्यात नीलांबरी यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने दवाखान्यात दाखल केले. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांच्यावरही दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सयाजी, सोनाली आणि रमा यांनी होम आयसोलेशन होत उपचार घेणे सुरू केले. योग्य उपचार, विश्रांती आणि सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर या पाटील कुटुंबीयांनी कोरोनाला हरविले.
प्रतिक्रिया
कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आम्ही ते लपवून ठेवले नाही. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून घराच्या प्रवेशव्दारात फलक लावला. वेळेत आणि योग्य उपचार घेतल्याने आम्ही कोरोनामुक्त झालो. ताप, कणकण असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत उपचार घ्यावेत.
-बाळासाहेब पाटील
घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मला अर्धातास काहीच सुचले नाही. मग, आम्ही सर्वजण एकत्र बसून या परिस्थिताला तोंड देण्याचे ठरविले. वय जास्त असल्याने आई-वडिलांना दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. मी, पत्नी आणि मुलगीने घरीच राहून उपचार घेतले. ३० सप्टेंबरपर्यंत आम्ही घरातच थांबलो. एकजूट, सकारात्मक मानसिकतेच्या बळावर आणि योग्य उपचार घेऊन आम्ही कोरोनाला हरविले. कोरोना झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. वेळेत उपचार घ्यावेत.
-प्रा. सयाजी पाटील
माझ्या एकटीमुळे इतरांना त्रास होवू नये म्हणून दवाखान्यात दाखल झाले. मानसिकता खंबीर ठेवली. बरी होवून घरी येणार असा निर्धार केला होता. वेळेवर औषधे, विश्रांती आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनामुक्त झाले.
-नीलांबरी पाटील
अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आम्हाला टेन्शन होते. पण, कुटुंबांतील अन्य सदस्य, नातेवाईक, शेजारी, प्रभागातील नगरसेवक यांच्या आधाराने ते दूर झाले. घरात आम्ही हलका आहार, व्हिटॅॅमिन सी असलेली फळे, दूध आणि योग्य उपचार घेऊन कोरोनाला हरविले.
-सोनाली पाटील
===Photopath===
300421\30kol_1_30042021_5.jpg
===Caption===
डमी (३००४२०२१-कोल-पॉझिटिव्ह स्टोरी डमी)