केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By Admin | Published: March 7, 2016 10:38 PM2016-03-07T22:38:32+5:302016-03-08T00:45:59+5:30

काम बंद पाडले : प्रकल्पग्रस्त दाखले, जमिनी त्वरित द्या; अन्यथा काम करू देणार नाही

Kelosi Project Corrupted Elgar | केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

googlenewsNext

धामोड : धरणासाठी वडिलोपार्जित मिळकतीचा सातबारा कसलाही विचार न करता आपल्या स्वाधीन करत संसारावर पाणी ओतले. त्यावेळी शासन प्रकल्पात गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखले व जमीन देईल असे वाटले होते; पण १२ वर्षांचा कालखंड लोटला, तरी आमची दखल कोणीच घेण्यास तयार नाहीत. याच उद्वेगातून रविवारी केळोशी बुद्रुक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणस्थळावर जाऊन १२ वर्षांनंतर सुरू झालेले काम बंद पाडले. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे बंद झालेले रस्ते करून दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, केळोशी बुद्रुक प्रकल्पाच्या कामाला २००१ मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाचा मूळ खर्च १0 कोटी ७३ लाख ८५ हजार २५ रुपये इतका निश्चित करून कामाला सुरुवात झाली. यातील भूसंपादनासाठीचे एक कोटी ८४ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले; पण त्यानंतर भक्कम अशा स्वरूपाचा निधी न मिळाल्याच्या कारणास्तव प्रकल्पाचे काम १२ वर्षे रेंगाळले. त्यामुळे धरणाचा खर्च २५ कोटींच्या घरात गेला आहे. आता या धरणाला निधी प्राप्त झाला असून, जवळपास १२ वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे; पण असे असले तरी या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अशा बहुतांशी शेतकऱ्यांना अद्याप कोणताच मोबदला मिळालेला नाही. पैकी काही शेतकऱ्यांना पर्यायी जमीनही दिलेली नाही. एवढेच नाही तर साधा प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखलाही शासनाने देण्याचे धाडस दाखविले नाही. आमच्या या मागण्यांसंदर्भात राधानगरीचे तहसीलदार यांना मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी बैठकीच्या तारखा देऊ नही या बैठका घेण्यासाठी कार्यकारी अभियंता अथवा तहसीलदार राधानगरी यांना वेळ मिळत नसावा, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब आहे. वरील सर्व बाबी आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविल्या असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.
प्रकल्पग्रस्तांंचे रखडलेले पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप, प्रकल्पामुुळे बंद झालेले शेतकऱ्यांचे रस्ते, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे काम पूर्ववत सुरू करू देणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गणपती सखाराम पाटील, एम. के . पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, विष्णू पाटील, कृष्णात पाटील, गणपती गोविंदा पाटील, सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, जोतिराम चौगले, राजाराम पाटील, मारुती चौगले, आदी शेतकरी उपस्थित होते.


दृष्टिक्षेपात धरण
कामास प्रारंभ - मे २००१, साठवण क्षमता - ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर, प्रकल्पाची लांबी ५५० मीटर, सांडवा - ७४ हेक्टर, लाभ क्षेत्र - ६२१ हेक्टर, शेतकरी बुडीत जमीन ८.५० हेक्टर, वन विभागाची बुडीत जमीन १३.८४ हेक्टर.


जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही
- गणपती पाटील, प्रकल्पग्रस्त

Web Title: Kelosi Project Corrupted Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.