दक्षिण महाराष्ट्रात केशरी वादळ
By admin | Published: February 25, 2017 12:32 AM2017-02-25T00:32:39+5:302017-02-25T00:32:39+5:30
कॉँग्रेस राजकारणाला तडाखा : राष्ट्रवादी काँग्रेसला झटका!
वसंत भोसले -- कोल्हापूर सातारा आणि सांगली या दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या वादळाने कॉँग्रेसी राजकारण उडत चालले आहे. ते कोठे जाऊन आदळेल याचा नेम नाही. कारण या कॉँग्रेसी राजकारणावर लोकांचे प्रेम आता संपत चालले आहे. याला नेत्यांची गटबाजी कारणीभूत ठरली आहे. यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षही सुटलेला नाही.
२०१२ या निवडणुकीत तिन्ही जिल्हा परिषदांच्या एकूण जागा १९८ होत्या. त्यापैकी ८८ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉँग्रेस पहिल्या क्रमांकावर होती. त्यांना आता ६४ जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांची सदस्यसंख्या ७५वरून ३१वर घसरली आहे. हा सर्वांत मोठा पराभव आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाला दक्षिण महाराष्ट्रात २६पैकी केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून कॉँग्रेसने एकही पाऊल टाकून कार्यकर्त्यांना बळ दिलेले नाही. त्यांची घसरण प्रत्येक निवडणुकीद्वारे होतेच आहे. तरीदेखील नेत्यांची गटबाजी संपत नाही. केवळ गटबाजीने ३० ते ४० जागा गमवाव्या लागल्या.
राष्ट्रवादी कॉँग्रेसही याच मार्गावरून जाते आहे. केवळ सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजपाच्या डावपेचांना उलथून टाकले. सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा ३९ जागा जिंकत बहुमत कायम ठेवले. सांगली जिल्हा परिषदेत या पक्षाचे बहुमत होते. त्यांचे ३३ सदस्य मागील निवडणुकीत निवडून आले होते. त्यांची घसरण होत केवळ १४ जागा या वेळी मिळाल्या. माजी मंत्री जयंत पाटील यांचे एकमेव नेतृत्व असताना त्यांना पक्ष ताकदीने निवडणुकीत उभा करता आला नाही.
भाजपाने मात्र ही निवडणूक खूप गांभीर्याने घेतली होती. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राची जबाबदारी होती. त्यांनी जोरदार प्रयत्न करीत दोन्ही कॉँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना भाजपामध्ये आणले. चंद्रकांतदादा यांचा सातारा किंवा सांगलीचा दौरा असेल तर आज कोण भाजपामध्ये प्रवेश करतो आहे, याचा धसकाच दोन्ही कॉँग्रेसने घेतला होता. याचा भाजपाला प्रचंड लाभ झाला. सांगली जिल्हा परिषदेत २०१२मध्ये भाजपाचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. त्या जिल्हा परिषदेत ६०पैकी २५ जागा जिंकून भाजपा सत्ताधारी होत आहेत. त्यांना बहुमतासाठी केवळ सहा सदस्य हवेत. त्यांच्या मित्रपक्षाचे पाच आणि दोन अपक्षही निवडून आले आहेत. सांगलीच्या इतिहासात जनसंघ किंवा भाजपाचा एकही सदस्य निवडणुकीत नव्हता तेथे चक्क बहुमतापर्यंत भाजपाने मजल मारली आहे. कोल्हापूरमध्येही भाजपाने मुसंडी मारली आहे. मित्रपक्षांसह २६ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने सहकार्याचा हात दिल्यास भाजपा कोल्हापुरातदेखील जिल्हा परिषदांच्या इतिहासात प्रथम सत्तेवर येणार आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातदेखील भाजपाने धडका मारल्या; पण त्यांना मर्यादित यश मिळाले. दक्षिण महाराष्ट्रात केवळ चार जागांवर ४६ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
शिवसेनेने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार आणि सातारा तसेच सांगलीत प्रत्येक एक असे आठ आमदार असताना केवळ १५ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. या पक्षाच्या नेत्यांच्या स्थानिक हितसंबंधामुळे मर्यादित यश मिळाले.
इतर पक्षांमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला झटका बसला. भाजपाचा मित्रपक्ष असताना सरकारच्या धोरणावरच त्यांनी सातत्याने टीका केली. शिवाय अनेक ठिकाणी कॉँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला.
परिणामी, या पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद सहावरून दोनवर आली. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी वादाचे प्रसंग स्वाभिमानी पक्षाला अडचणीत आणले. त्यात सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला. याउलट माजी मंत्री विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षाला सहा जागा कोल्हापूर जिल्ह्यात मिळाल्या.