केशवराव भोसले पुस्तक प्रेरणादायी

By Admin | Published: August 10, 2016 12:21 AM2016-08-10T00:21:32+5:302016-08-10T01:13:42+5:30

सोपानराव चव्हाण : ‘पुरोगामी देशभक्त संगीत, नाट्यसूर्य केशवराव भोसले’चे प्रकाशन

Keshavrao Bhosale Book Inspirational | केशवराव भोसले पुस्तक प्रेरणादायी

केशवराव भोसले पुस्तक प्रेरणादायी

googlenewsNext

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या कालावधीत संगीत नाट्यकलेला समृद्ध केले. मात्र, त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि पुरोगामी व्यक्ती म्हणून असलेली ओळख नागरिकांना विशेषत: नव्या पिढीला नाही. त्यामुळे ‘पुरोगामी देशभक्त संगीत, नाट्यसूर्य केशवराव भोसले’ हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य डॉ. सोपानराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून होते. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. व्यासपीठावर विश्वशाहीर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष
डॉ. राजीव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, केशवराव भोसले यांची पुतणी प्रेमला भोसले, मीरा चव्हाण उपस्थित होत्या.
यावेळी चव्हाण म्हणाले, कोल्हापूरला ‘कलानगरी’ ही बिरुदावली मिळाली त्यात केशवराव भोसले यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. बालपणातच रंगमंचावर पाऊल ठेवलेले केशवराव राजर्षी शाहू महाराजांचा ‘शब्द’ मोडून हुबळीला गेले व तेथे नाट्य कंपनी स्थापन केली. पुण्यात त्यांची नाटके विशेष गाजली. त्यानंतर पुन्हा कोल्हापुरात येऊन संगीत नाटकांचे सादरीकरण केले. वक्तशीरपणा त्यांच्या स्वभावातच होता. त्यांनी नाट्यक्षेत्रात योगदान दिलेच, मात्र ते पुरोगामी विचारांचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे या पुस्तकाने उलगडले आहेत.
महापौर अश्विनी रामाणे म्हणाल्या, कोल्हापूर ही कलानगरी आहे. केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहाचे महापालिकेने नूतनीकरण केले आहे. हे नाट्यगृह नव्या दिमाखात प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे. या माध्यमातून देशपातळीवर नावलौकिक मिळविणारे कलाकार निर्माण व्हावेत.
प्रेमला भोसले यांनी केशवरावांच्या कार्याची माहिती दिली. डॉ. सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजीव चव्हाण यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. जयश्री चव्हाण यांनी आभार मानले. त्यानंतर नूपुर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाट्यगीते सादर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Keshavrao Bhosale Book Inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.