कोल्हापूरच्या नाट्यपरंपरेचे साक्षीदार ‘केशवराव भोसले’ शंभरीत
By admin | Published: October 14, 2015 12:39 AM2015-10-14T00:39:56+5:302015-10-14T01:08:34+5:30
नूतनीकरण पूर्ण : नव्या दिमाखात रसिकांच्या सेवेसाठी सज्ज; सौंदर्य आणखी खुलले
इंदुमती गणेश -- कोल्हापूर कोल्हापूरच्या संगीत-नाट्य परंपरा, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला दिलेल्या राजाश्रयाचा आणि पुढील कित्येक पिढ्या आपल्या अस्तित्वाने या परंपरेचा देदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आज, बुधवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. राज्य शासनाच्या १० कोटींच्या निधीतून कोल्हापूर महापालिकेने या वास्तूचे नूतनीकरण करून तिचे सौंदर्य अधिक खुलविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दिमाखात मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.
शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे संगीत आणि नाट्य या दोन्ही कलांनी कोल्हापूरचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या युरोप दौऱ्यात कुस्ती आखाड्यांसोबतच अनेक नाट्यगृहेदेखील पाहिली होती. असे नाट्यगृह आपल्या संस्थानातही असावे, या इच्छेने त्यांनी तिकडून आल्यावर तातडीने नाट्यगृहाच्या आणि खासबाग मैदानाच्या उभारणीसाठी पावले उचलली. हे नाट्यगृह बांधण्यापूर्र्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. त्याकाळी शाहू महाराजांच्या दरबारी असलेले आर्किटेक्ट दाजीराव विचारे यांनी या नाट्यगृहाची इमारत उभारली. जीवबा कृष्णाजी चव्हाण यांनी या वास्तूचा आराखडा तयार केला होता. युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्शन कंपनीच्या ‘सौभद्र’ या नाटकाने व किर्लोस्कर कंपनीच्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगांनी येथे तिसरी घंटा वाजली. ही वास्तू महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. मात्र, वास्तूची बांधणीच इतकी मजबूत आहे की, त्यातील एक दगडही ढासळलेला नाही; पण नाट्यगृहाच्या दुर्दशेचा फेरा गतवर्षी संपला आणि काही काळासाठी काळवंडलेल्या या पडद्याला नवी झळाळी मिळाली आहे.
नाट्यगृहाची वैशिष्ट्ये
त्याकाळी हे भारतातील एकमेव सर्वांत मोठे नाट्यगृह होते. याच्या बांधकामास ९ आॅक्टोबर १९१३ रोजी सुरुवात झाली. १४ आॅक्टोबर १९१५ रोजी ते पूर्ण झाले. पूर्वीच्या काळी माईक सिस्टीमसारखे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते; त्यामुळे कलाकारांना मोठ्याने संवाद आणि गीते म्हणावी लागत असत. कलाकारांचा आवाज शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी रंगमंचाखाली विहीर बांधण्यात आली होती. त्यामुळे कलाकारांचा आवाज नाट्यगृहात घुमायचा, हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे.
नामांतराचे कारण
कोल्हापुरात जन्म झालेल्या केशवरावांनी वयाच्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले. शारदा नाटकातील ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. अठराव्या वर्र्षी त्यांनी ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळी स्थापन करून संगीत सौभद्र, संस्कृत भाषेतील ‘शाकुंतल’ अशी अनेक संगीत नाटके सादर केली. बालगंधर्व यांच्याबरोबर केलेल्या ‘संयुक्त मानापमान’च्या पहिल्या प्रयोगावेळी त्यांच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. केशवरावांच्या अल्पशा कारकिर्र्दीत त्यांना राजर्र्षी शाहूंनी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे ते शाहू महाराजांचे अत्यंत लाडके कलावंत होते. म्हणून या नाट्यगृहाला ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नाव देण्यात आले.
पहिले ओपन एअर थिएटर
नाट्यगृहामागे बांधण्यात आलेल्या खासबाग मैदानात शाहू महाराजांनी त्याकाळी पहिले ओपन एअर थिएटर बांधून घेतले. त्यावेळी त्याचे नाव ‘पॅलेस एरिना’ होते. शाहू महाराजांच्या विनंतीवरूनच या थिएटरचे उद्घाटन केशवराव भोसलेंच्याच ‘मृच्छकटिक’ संगीत नाटकाच्या सादरीकरणाने झाले. त्याकाळी २५ हजार पुरुष आणि पाच हजार महिलांनी हे नाटक पाहिल्याचा उल्लेख त्या काळच्या वृत्तपत्रांत आहे. देशातील नाट्यक्षेत्रातील इतिहासात एवढ्या मोठ्या समूहाने पाहिलेले ते एकमेव नाटक होते.