Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीचे गूढ उकलण्याचे आव्हान, ‘सीसीटीव्ही’तूनच सत्य येणार समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:48 PM2024-08-12T16:48:57+5:302024-08-12T16:49:38+5:30
साहित्य न हलविण्याच्या ‘फॉरेन्सिक’च्या सूचना
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिस, फॉरेन्सिक विभाग तसेच महापालिका चौकशी समितीसमोर आहे. या आगीबाबत दोन-तीन दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली नसल्याची बाब समोर आल्यामुळे या चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीमार्फत नाट्यगृहाच्या आगीची चौकशी सुरू झाली असून समिती वेगवेगळ्या विभागाकडून, व्यक्तीकडून माहिती घेत आहे. या कामाला सुरुवात होत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दौरे झाले. त्यामुळे समितीतील अधिकाऱ्यांचा वेळ मंत्र्यांच्या दौऱ्यातच गेला. आज, सोमवारपासून या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
इलेक्ट्रिकल तज्ज्ञांनी केलेल्या अनौपचारिक पाहणीतून तसेच महावितरणतर्फे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याचा खुलासा करण्यात आल्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली, असा सवाल उपस्थित झाला आहे. नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कुस्तीच्या मॅटमुळे आग भडकली असावी, असा संशय घेतला जात आहे. शिवाय आग लागल्यानंतर काही मिनिटांनी तेथे दोन मोठे आवाज झाल्याची चर्चाही आता ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. या चौकशीकामी महत्त्वाचा दुवा म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही असून त्याचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. त्यातूनही काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कुस्त्यांच्या मॅटनी केला घात
आगीचा भडका उडण्यास कुस्त्यांच्या मॅटनी मोठा हातभार लावल्याचे प्राथमिक पाहणीवरून स्पष्ट झाले आहे. खासबाग मैदानातील व्यासपीठावर बरीच मॅट होती. काही मॅट नाट्यगृहाच्या भिंतीला लावून ठेवण्यात आली होती. या मॅटनी पेट घेतल्यामुळे आग नाट्यगृहाकडे वळली. कुस्ती सराव करण्यास संबंधित पैलवानांनी परवानगी घेतली होती का? या मॅट कोणी आणून ठेवल्या होत्या, त्याची पुरेशी दक्षता घेतली का नाही, या गोष्टी चौकशीतून पुढे येणार आहेत.
मग ट्रीप कसे झाले नाही
शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून महावितरण विभागाने मार्गदर्शक नियम घालून दिले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिकची कामे करणारे तंत्रज्ञ त्याचे काटेकाेरपणे पालन करतात. जर वीजप्रवाह वाढला किंवा कमी झाला की शॉर्ट सर्किट न होता ट्रीप होऊन विद्युत पुरवठा बंद होतो. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहात ट्रीपही झालेले नाही. इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनेल, इन्व्हर्टर रूम तसेच तेथून बाहेर पडणाऱ्या वायर्स सर्व काही सुस्थितीत आहे. त्यामुळेच आग लागली की लावली, असा संशय व्यक्त होत आहे.
साहित्य न हलविण्याच्या ‘फॉरेन्सिक’च्या सूचना
नाट्यगृहातील साहित्याला कोणीही हात लावू नये, तेथील साहित्य हलवू नये, अशा सूचना फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यांना आवश्यकता वाटली तर ते पुन्हा चौकशी करणार आहेत. त्यामुळे पालिकेने तेथे सकाळी आठ ते रात्री आठ अशा वेळेत चार अधिकारी, अग्निशमन दलाचे सहा जवान व एक बंब तेथे तैनात करण्यात आला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट करणार
नाट्यगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी अल्प काळाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या निविदा आज, सोमवारी उघडल्या जातील. त्यानंतर ठेकेदार निश्चित करून स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. जोपर्यंत हे ऑडिट होत नाही तोपर्यंत नाट्यगृहाची उभारणी कशी करायचे हे ठरणार नाही.