कोल्हापूरचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग; सर्व सामान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:59 PM2024-08-08T22:59:54+5:302024-08-08T23:00:13+5:30
जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
कोल्हापूर - शहराचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्यावर इमारत जळून गेली होती. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
आग एवढी भयानक होती की अग्निशमन दलालाही या ठिकाणी ही आग विझवताना अडचणी येत होत्या. लाकूड सामान, होमच्या खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आग आणखी भडकत गेली. जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न #Kolhapurpic.twitter.com/qGqCJcEyi5
— Lokmat (@lokmat) August 8, 2024
केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी दुर्घटना
संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे जयंती शुक्रवारी असल्यामुळे शासनाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावरील चित्र प्रदर्शन ही मांडण्यात आले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते. त्या आधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली.