केशवराव भोसले नाट्यगृह जसे होते तसे बांधू, स्ट्रक्टवेल कंपनीचे सादरीकरण; कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:29 PM2024-10-01T12:29:46+5:302024-10-01T12:30:39+5:30
सादरीकरणातील महत्त्वाचे मुद्दे.. वाचा
कोल्हापूर : पर्यावरणीय, ध्वनियंत्रणा, तंत्रज्ञान तसेच वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या आणि शंभर वर्षांपासून ऐतिहासिक बाज डौलाने मिरवणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत जशी होती तशीच उभारण्याचा संकल्प मुंबईस्थित स्ट्रक्टवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सोमवारी सादरीकरणाद्वारे केला. त्यामुळे रंगकर्मींसह तमाम कोल्हापूरकरांच्या नाट्यगृहाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या. सादरीकरणावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ काही काळ ऑनलाइन उपस्थित होते.
या नाट्यगृहास ८ ऑगस्टला लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृहाच्या मागील बाजूचा तसेच छताचा बराचसा भाग जळून खाक झाला. त्यामुळे नाट्यगृहाची इमारत जशी होती तशी उभारली जावी, अशी मागणी होऊ लागली होती. तरीही इमारतीच्या भिंती किती मजबूत आहेत याबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु सोमवारी झालेल्या सादरीकरणानंतर सर्व शंका दूर तर झाल्याच शिवाय नाट्यगृह पूर्वीसारखे होणार याचीही खात्री पटली. ‘स्ट्रक्टवेल’चे कार्यकारी संचालक चेतन रायकर यांनी अतिशय साध्या, सोप्या भाषेत सादरीकरण केले.
उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन अनेकांच्या मनातील शंका दूर केल्या. चर्चा सकारात्मक झाल्याने आता कामाला लवकर सुरुवात करा आणि एकदा नाट्यगृह पूर्ववत उभारा अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सादरीकरणातील महत्त्वाचे मुद्दे
- इमारतीच्या सर्व बाजूच्या भिंती मजबूत. वरच्या बाजूने दीड दोन मीटर भिंती उतरून घेऊन त्यावर बांधकाम करणार.
- पूर्वी इमारतीला जेथे दगड होता तेथे दगड, जेथे लाकूड होते तेथे लाकूड, जेथे लोखंड होते तेथे लोखंडाचा वापर करणार.
- पावसाळ्यात छतावरून पाणी गळणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन रुफकाम पूर्वीप्रमाणेच करणार.
- रंगमंचचे फ्लोरिंग अतिशय चांगले आहे ते तसेच ठेवणार, पडद्यांची हालचालीसाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणार.
- १६० चारचाकी, २६० दुचाकी वाहनांची अंडरग्राउंड पार्किंगची सुविधा देणार
- आर्टगॅलरी, कॅन्टीन, ग्रीनरूम, मेकअप रूम, रिहर्सल रूम, अटॅच बाथरूम, सुरक्षारक्षक केबिन.
- बैठक व्यवस्था ८०० खुर्च्यांची करणार, दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय.
- आग लागणार नाही, शॉर्टसर्किट होणार नाही, आग लागलीच तरी तात्काळ पाण्याचे फवारे सोडण्याची यंत्रणा.
- धोका व्यवस्थापन तसेच अद्यावत ध्वनी यंत्रणेचा समावेश.
स्ट्रक्टवेल कंपनीविषयी ..
हेरिटेज वास्तू उभारणीतील ५८ वर्षांचा अनुभव. कंपनीकडे ३५० अभियंता कार्यरत. २२ राज्यात, १२ देशात कंपनीचे काम. देश-विदेशातील ग्रेड १ हेरिटेज वास्तू, राजवाड्यांची दुरुस्ती तसेच संवर्धनाचे काम पूर्ण. कंपनीचे सध्या २५० प्रोजेक्टवर काम सुरू. आगीने उद्ध्वस्त झालेल्या ३०० हेरिटेज वास्तूचे पुनर्निर्माण, भूकंपामुळे खराब झालेल्या १० हजार इमारतीचे संवर्धन.