Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृह आहे त्या स्थितीत उभारणार, सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:19 PM2024-08-13T13:19:30+5:302024-08-13T13:20:38+5:30
शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती, आचारसंहितेपूर्वी निविदा काढण्याचा आग्रह
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग चटका लावणारी आहे. ती ऐतिहासिक वास्तू ‘आहे त्या स्थितीत’ पुन्हा उभी करावी ही लोकभावना आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक काढले, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. आता ही वास्तू केशवराव भोसले यांच्या जयंतीपूर्वी वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. बांधकामावर शासन देखरेख करेल, परंतु खासदार शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखालील शासकीय समिती दबावगट म्हणून काम करेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहावर सोमवारी खासदार शाहू छत्रपतींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. शाहू छत्रपतींनी प्रास्ताविक करताना बैठकीचा हेतू स्पष्ट केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, व्ही. बी. पाटील, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, अभिनेता आनंद काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आयुक्तांनी २५ कोटी रुपयांचा अंदाज काढला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनीही त्याची खात्री दिली आहे, मात्र हा निधी मिळवण्यासाठी निविदा, त्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती, डीपीआर, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता या प्रक्रियेची पूर्तता करावी लागेल. निधीला आचारसंहितेचा अडथळा आहे. त्यातून मार्ग काढूया. सात दिवसांत शॉर्ट टेंडर काढण्यासाठी आयुक्तांना सूचना देतो, त्यापूर्वी एकमताने निश्चित केलेल्या आर्किटेक्टकडून काम सुरू करून घेऊया, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. या वास्तूत सामान्य व्यक्तींचाही आत्मा आहे. त्यामुळे सरकारी निधी कमी पडला तर जनतेने निधी देणे गैर नाही. शाहू महाराजांचा पुतळाही लोकवर्गणीतून उभा राहिला होता. शंभर वर्षांपूर्वीच्या या वास्तूचा मूळ ढाचा कायम ठेवून तो पुढची १३५ वर्षे कसा टिकेल, याचा विचार करून याचे बांधकाम करा, यासाठी कलाकार, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, तज्ज्ञांचा विचार घ्या, शाहू महाराज असते तर त्यांनीही पुढचा विचार केला असता, ते काम एक वर्षात होणार नाही, हा पोरखेळ नाही, त्यामुळे शासकीय समिती व्हावी, आपण वॉचडॉग म्हणून काम करूया.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहूंचा वारसदार म्हणून ओळख असली तरी खासदार म्हणून सहा वर्षांपासून रायगड संवर्धन जतन समितीचे अध्यक्षपद, संसदेतील संवर्धन समितीवर काम केले आहे. त्यामुळे संवर्धन, जतन आणि संरक्षण या तीन मुद्द्यांवर बांधकाम करायचे आहे, हे जाणून घ्या. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रकाशित करा, काॅन्झर्वेशन आर्किटेक्ट नेमा, शाहूंच्या वास्तूत सिमेंटचे बांधकाम झाले, तसे करू नका. दूरदृष्टी मांडणारे आर्किटेक्ट, कलाकार, आमदार, खासदार यांची योग्य समिती स्थापन करा, माझाही अनुभव कामी येईल. शाहू महाराज रोमला गेले ते पाहूनच त्यांनी नवीन तंत्रज्ञान इथे आणले, त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान वापरा, इकाॅस्टिक्स चुकले तर कलाकारांना उपयोग होणार नाही.
टक्केवारी चालणार नाही - संभाजीराजे
नाट्यगृह उभारणी हा आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा तसेच भावनिक विषय आहे. त्यामुळे या प्रक्रियेत टक्केवारी चालणार नाही, तसे झाले तर गाठ माझ्याशी आहे, असा शब्दात संभाजीराजेंनी ठणकावले.