‘केशवराव’चा प्रस्ताव रेंगाळला मंजुरीची प्रतीक्षा : जीएसटी’ने वाढला दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:45 AM2018-06-17T00:45:00+5:302018-06-17T00:45:00+5:30

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे.

'Keshavrao's proposal waits for approval for Rengal: GST gets increased rate | ‘केशवराव’चा प्रस्ताव रेंगाळला मंजुरीची प्रतीक्षा : जीएसटी’ने वाढला दर

‘केशवराव’चा प्रस्ताव रेंगाळला मंजुरीची प्रतीक्षा : जीएसटी’ने वाढला दर

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून सुधारित प्रस्ताव शासनाकडे; ‘

इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे. सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून दोन महिने झाले तरी त्यावर शासनाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही.

महाराष्ट्राच्या संगीतनाट्य परंपरेला समृद्ध करणारे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जपलेले कलासक्तपण. या नाट्यगृहाचे २०१४ साली नूतनीकरण सुरू झाले आणि दीड-पावणे दोन वर्षात नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचे पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण पूर्ण झाले. गेल्या काही वर्षांत कोणत्याही वादाविना पार पडलेला हा कोल्हापुरातील पहिलाच प्रकल्प म्हणावा लागेल. त्यासाठी १० कोटींचा निधी खर्च झाला.

नूतनीकरणाच्या दुसºया टप्प्यात परिसराचे सुशोभीकरण, ब्लॅक बॉक्स, कॅँटीन, कंपाउंड वॉल, पार्किंग, लॉन अशी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वी ८ कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र विभागीय आयुक्तांनी काही शंका उपस्थित करून सूचना केल्या. त्यानुसार छाननी करण्यात आली. दरम्यान, गतवर्षी जुलैमध्ये जी.एस.टी. लागू झाल्याने पुन्हा नव्याने प्रस्तावाचे अंदाजपत्रक तयार करावे लागले. त्यात आता दीड कोटीची वाढ झाली असून, हा प्रस्ताव ९ कोटी ९० लाखांवर गेला आहे. वरील सुधारित प्रस्ताव महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून तो विभागीय आयुक्तांकडे जातो.त्यांच्या मंजुरीनंतर पुढे शासनाकडे पाठविला जातो. मात्र, या प्रस्तावाचे पुढे काय झाले, हे महापालिकेला माहीत नाही; किंबहुना महापालिकेकडून त्याचा पाठपुरावाही करण्यात आलेला नाही.
त्यामुळे नाट्यगृहाचा दुसऱ्या टप्प्यातील विकासाचा प्रस्ताव रेंगाळला आहे.

पुतळा नाही, प्रवेशद्वारावर नावही नाही
महापालिकेने नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी परिसरात केशवरावांचा पुतळा उभारण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात ते शक्य झाले नाही; पण दुसºया टप्प्यातही तसा प्रस्ताव नाही. केशवराव भोसले या नावाचे काय कर्तृत्व आहे, त्याची माहिती नाही.
ही इमारत नेमकी कशाची आहे, हे कळण्यासाठी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरच नावाचा मोठा फलक लावणे अपेक्षित आहे.


केशवरावांचे चित्र छतावर, महापुरुषांकडे पाठ
पहिल्या टप्प्यातील नूतनीकरणानंतर ज्यांच्या नावे हे नाट्यगृह आहे, त्या संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे चित्र थेट छतावरच लावण्यात आले आहे. खुर्चीत बसून कंटाळलेल्या माणसाने मान वर केल्यानंतरही दिसू नये, अशा पद्धतीने हे चित्र लटकावले आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरच्या नाट्यपरंपरेला ज्यांनी सोनेरी पान दिले, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बालगंधर्व यांच्यासह दिग्गज व्यक्तींची चित्रे प्रेक्षागृहात मागच्या भिंतीला लावली आहेत. आलेला प्रेक्षक थेट खुर्चीत बसतो. त्याने मागे वळून कोणते चित्र कोणाचे आहे, हे पाहायचे काही कारणच नाही. गेल्या अडीच वर्षांत यावर कोणत्याही नाट्यकर्मींनी किंवा रसिकांनी आक्षेप नोंदविला नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
 

जीएसटी लागू झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार नाट्यगृहाचा सुधारित प्रस्ताव तयार करून तो दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. प्रस्ताव कुठल्या टप्प्यात आहे, हे अद्याप समजलेले नाही.
- अनुराधा वांडरे,
(प्रकल्प अधिकारी)

 

Web Title: 'Keshavrao's proposal waits for approval for Rengal: GST gets increased rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.