‘केशवराव’ची तिसरी घंटा ‘राज्य नाट्य’ने?

By admin | Published: October 28, 2015 12:44 AM2015-10-28T00:44:39+5:302015-10-28T00:46:03+5:30

संयोजकांचा मुख्यमंत्र्यांना मेल : स्पर्धेची कोल्हापुरातील प्राथमिक फेरी २८ नोव्हेंबरपासून

Keshavrao's third hour of 'State drama'? | ‘केशवराव’ची तिसरी घंटा ‘राज्य नाट्य’ने?

‘केशवराव’ची तिसरी घंटा ‘राज्य नाट्य’ने?

Next

इंदुमती गणेश - कोल्हापूरच्या नाट्य-संगीत कलापरंपरेचा साक्षीदार असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची नूतनीकरणानंतरची ‘तिसरी घंटा’ राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेने होण्याची शक्यता आहे. श्रेयवादात नाट्यगृहाचे उद्घाटन न लांबविता ‘राज्य नाट्य’नेच त्याची तिसरी घंटा वाजावी, यासाठी संयोजकांनी मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांसह आयुक्तांना या विनंतीचा ई-मेल पाठविला आहे. असे झाले तर हा कोल्हापूरच्या नाट्यचळवळीसाठी आणि रसिकांसाठीही दुग्धशर्करा योग असणार आहे.
कलासक्त राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची साक्ष आणि येथील नाट्यकलेची परंपरा सांगणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण जवळपास एक वर्ष आठ महिन्यांनी पूर्ण झाले आहे. हे काम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मार्गी लागले. विशेषत: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी यात विशेष लक्ष घातले होते. दीड महिन्यापूर्वी उद्घाटनासाठी म्हणून नाट्यगृहाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीही उद्घाटनाच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, दोन्ही वेळा मुहूर्त लांबणीवर पडला.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेची कोल्हापुरातील प्राथमिक फेरी २८ नोव्हेंबरपासून जाहीर करण्यात आली आहे. यात १५ संस्थांनी सहभाग घेतला आहे. नाट्यगृह बंद असल्याने गतवर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यंदाही नाट्यगृहाचे उद्घाटन कधी होणार हे अनिश्चित असल्याने केंद्र समन्वयक मिलिंद अष्टेकर, प्रशांत जोशी यांनी शाहू स्मारकचे बुकिंग केले आहे. मात्र, या हॉलची प्रेक्षक क्षमता अत्यंत कमी आहे. शिवाय, तिथे नाटक सादरीकरणासाठीच्या आवश्यक सोयी-सुविधा नाहीत. केशवराव भोसले हे एकमेव नाट्यगृह आहे, जे नाटकांच्या सादरीकरणासाठी योग्य आहे. त्यासाठी संयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना तशा आशयाचे ई-मेल पाठविण्यात आले आहेत. राज्य नाट्यसारख्या स्पर्धांनी या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले तर तो दुग्धशर्करा योग असणार आहे.


उद्घाटन रखडू नये ही इच्छा
नाट्यगृहाचे उद्घाटन कधी होणार हे अजूनही ठरलेले नाही. निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, केवळ राजकीय श्रेयवादामध्ये उद्घाटन रखडू नये आणि शासनाचीच ‘राज्यनाट्य’सारखी महत्त्वाची स्पर्धा केवळ उद्घाटन झाले नाही, म्हणून अन्य ठिकाणी घ्यावी लागू नये, अशी कोल्हापुरातील रंगकर्मींची इच्छा आहे.

नाट्यगृहाचे काम अपूर्ण असते तर आम्ही उद्घाटनाचा आग्रह धरला नसता. मात्र, केशवराव भोसले नाट्यगृहाचे केवळ उद्घाटन होणे बाकी आहे. शाहू स्मारकमध्ये या स्पर्धा घेणे संयोजनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरते; त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेनेच नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजावी, यासाठी आम्ही विनंती केली आहे.
- प्रशांत जोशी (प्रतिज्ञा नाट्यरंग)

Web Title: Keshavrao's third hour of 'State drama'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.