हाथरस प्रकरणावरून कोल्हापूर जिल्हा परिषदेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:03 PM2020-10-19T18:03:20+5:302020-10-19T18:05:43+5:30
Hathras Gangrape, zp, kolhapurnews हाथरस येथील अत्याचाराच्या प्रकरणावरून जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली. अखेर बलात्काराच्या सर्वच घटनांचा निषेध करून वादावर पडदा टाकण्यात आला.
कोल्हापूर : हाथरस येथील अत्याचाराच्या प्रकरणावरून जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली. अखेर बलात्काराच्या सर्वच घटनांचा निषेध करून वादावर पडदा टाकण्यात आला.
दुपारी सभा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे सदस्य सुभाष सातपुते यांनी हाथरस येथील बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अडविल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यावर भाजपचे विजय भोजे यांनी महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणांची जबाबदारी कुणाची, अशी विचारणा केली.
कोविड सेंटरमध्येही अशा अनेक घटना घडल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले. राजवर्धन निंबाळकर, हेमंत कोलेकर यांनीही सातपुते यांच्या ठरावाला विरोध केला. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी हाथरस प्रकरणावरून देशभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे सांगितले.
अखेर पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी सर्वच बलात्काराच्या घटनांचा निषेध करत हा विषय संपविण्याची सूचना केली. त्यानंतर दोन तास झालेल्या सभेत अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या शाळेसाठी घेतलेला निधी, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप या विषयांवरून खडाजंगी होतच राहिली. अखेर गोंधळात सभा गुंडाळण्यात आली.