‘खाकी’साठी ‘खादी’ उतरली रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 12:17 AM2017-04-07T00:17:55+5:302017-04-07T00:17:55+5:30

सर्वपक्षीय पाठिंबा : आमदारांना नडणाऱ्या मांजरे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रसंगी तीव्र लढ्याची तयारी

'Khadi' on the road for Khakee! | ‘खाकी’साठी ‘खादी’ उतरली रस्त्यावर !

‘खाकी’साठी ‘खादी’ उतरली रस्त्यावर !

googlenewsNext



प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे नेतेही कर्जमाफीच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. मात्र, दुसरीकडे कऱ्हाडचे काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांना नडणाऱ्या फौजदाराला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसेचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र कऱ्हाडला पाहायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुक्यात प्रचारादरम्यान विधान परिषदेतील काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला तांबवे येथे मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी चुकीची वागणूक दिली, असा आरोप होत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी कऱ्हाड तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना निलंबित करत असल्याची घोषणा विधान परिषदेत केली.
दरम्यान, या घटनेनंतर सर्व स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. आनंदराव पाटील समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, निलंबनाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणत आमदारांना नडणाऱ्या फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना व स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे व मनसेचे मनोज माळी यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर मंगळवारी कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलनही झाले.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शिवसेनेचे शहरप्रमुख शशिराज करपे, मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी, शिवसंग्रामचे रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे काँगे्रस आमदारांच्या विरोधात आणि एका फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसे, शिवसंग्रामचे पदाधिकारी एकवटलेले दिसत आहेत.
काय घडली होती घटना..!
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धावपळ सुरू असताना तांबवे गावाजवळ आनंदराव पाटील यांचे वाहन अडविण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. पण ही तक्रार दाखल करायला गेलेल्या आमदार पाटील यांची मांजरे यांनी दखल घेतली नाही. त्यांना दोन तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवल्याचा पाटील यांचा आरोप आहे.
मांजरे कामावरच !
तालुका पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या निलंबनाची घोषणा होऊन आठ दिवस लोटले आहेत. मात्र, मांजरे प्रत्यक्षात आजही पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत दिसत असल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र, निलंबन झाले आहे की नाही. याबाबत अधिकृत माहिती देताना कोणीच दिसत नाही.

Web Title: 'Khadi' on the road for Khakee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.