खाकीवर हात तरी पोलीस शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:32+5:302021-02-20T05:05:32+5:30

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : शहरातील अवैध व्यावसायिकांचे बळ वाढून ते आता थेट खाकी वर्दीवर हात ...

Khaki hands though police quiet | खाकीवर हात तरी पोलीस शांत

खाकीवर हात तरी पोलीस शांत

Next

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : शहरातील अवैध व्यावसायिकांचे बळ वाढून ते आता थेट खाकी वर्दीवर हात टाकण्यापर्यंत पोहोचले आहेत. यातून खाकीचा धाक कमी होऊन अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. चक्क पोलीस उपअधीक्षकांच्या पथकालाच अरेरावी करत त्यांचे कपडे फाडेपर्यंत मजल पोहोचली आहे. ही अतिशय गंभीर बाब असूनही इचलकरंजी पोलीस अद्याप शांतच आहेत.

शहरात उत्तम-प्रकाश चित्रमंदिरजवळ ओपन बार सुरू असल्याची व त्यातील काहीजणांनी जवळ शस्त्र बाळगले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील एका पोलीस नाईकला धक्काबुक्की करत त्याच्या अंगावर धावून जात त्याचा शर्ट फाडला. हा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात धन्यता मानली.

कोल्हापुरात दोन वर्षांपूर्वी अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील एका अधिकाऱ्याच्या वर्दीला हात लावण्यासह पोलीस शस्त्र हिसकावल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी खाकीचा धाक काय असतो, हे दाखवून देत संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारांसह अवैध व्यवसायाची पाळेमुळेच उखडून टाकण्याची किमया केली होती. तसाच काहीसा प्रकार इचलकरंजीत घडल्यानंतर वर्दीला आव्हान देणाऱ्याविरुद्ध पोलिसांची कठोर भूमिका दिसत नाही. 'सदरक्षणाय-खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला धक्का देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच ठेचून कठोर कारवाई करण्यासह शहर परिसरातील गुन्हेगारांवर खाकीचा धाक निर्माण करण्यासाठी वरिष्ठांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

चौकट

सुमारे ९६ जण आत; तरीही गुन्ह्यात वाढ

गत काही महिन्यांपासून शहरात पुन्हा वाढत चाललेल्या गुन्हेगारी घडामोडींमुळे नागरिकांत पुन्हा धास्ती निर्माण होत चालली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, चोरी, अवैध व्यवसाय, फसवणूक आदींसह विविध गुन्ह्यांची मालिकाच सुरू झाली आहे. मोक्का कारवाईमुळे शहरातील सुमारे ९६ जण कारावासात आहेत. तरीही गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.

Web Title: Khaki hands though police quiet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.