खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हरफ्लो ' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:32 PM2020-07-12T18:32:13+5:302020-07-12T18:40:34+5:30
खामकरवाडी पाझर तलाव आज सकाळी 'ओव्हरफ्लो' झाला. राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरलेला हा पहिला लघु प्रकल्प आहे.
धामोड: खामकरवाडी - अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प रविवारी सकाळी पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरला . प्रकल्पाच्या उजव्या बाजूस असणार्या सांडव्यावरून तुळशी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे . त्यामुळे तुळशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे .
गेल्या पाच सहा दिवसापासून पावसाने दांडी मारली असतानाही प्रकल्पात येणाऱ्या ओढ्या- नाल्यातील पाण्यामुळे खामकरवाडी (ता. राधानगरी येथील खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यानचा लघु पाठबंधारे प्रकल्प रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला .
सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून अतिरीक्त पाणी तुळशी नदीपात्रात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरून वाहणारा हा पहिलाच लघु प्रकल्प असून, स्थानिक नागरिक आणि सुटकेचा श्वास सोडला आहे.
यावर्षी हा प्रकल्प मार्चमध्येच पूर्ण कोरडा पडला होता. त्यातच जून अखेरपर्यंत पाऊसच न लागल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार का? याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांच्या मनात साशंकता होती . पण आज सकाळी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.
११६२.७८ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने व प्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे . या प्रकल्पामुळे परिसरातील २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते आहे .