ग्रामस्वच्छता अभियानात खानापूर ग्रामपंचायत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:25 IST2025-02-14T12:24:50+5:302025-02-14T12:25:07+5:30
गोलिवडे द्वितीय, तर हिरलगे ग्रामपंचायत तृतीय

ग्रामस्वच्छता अभियानात खानापूर ग्रामपंचायत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम
आजरा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत खानापूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेत गोलिवडे (ता. पन्हाळा) व हिरलगे (ता. गडहिंग्लज) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने जिल्ह्यातील १२ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची या स्पर्धेसाठी तपासणी केली होती. २०० गुणांच्या या परीक्षेत खानापूर १९०, गोलिवडे १८३, हिरलगे ग्रामपंचायतीला १६२ गुण मिळविले. स्व. वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा सांडपाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपयांचा पुरस्कारही खानापूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. स्व. आबासाहेब खेडकर यांच्या नावाने दिला जाणारा शौचालय व्यवस्थापनाचा गोलिवडे ग्रामपंचायतीला ५० हजारांचा पुरस्कार मिळाला आहे.
जिल्हास्तरीय समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शालेय शौचालय, गावातील परिसर यांची पाहणी करण्यात आली होती. खानापूर ग्रामपंचायतीने यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून, सहा लाखांचे बक्षीस मिळविले आहे. विशेष दोन पुरस्कारांचे प्रत्येकी ५० हजार असे एक लाखाचे बक्षीस मिळाले आहे.
याकामी सरपंच संकल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, सदस्य विश्वास जाधव, युवराज जाधव, माधुरी गुरव, अलका चव्हाण, सुशिला जाधव, सीताबाई दोरुगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, आबासाहेब मासाळ यांनी मार्गदर्शन केले.