खानापूरचे कुस्ती मैदान बरोबरीत
By admin | Published: October 26, 2015 12:14 AM2015-10-26T00:14:23+5:302015-10-26T00:23:30+5:30
शौकिनांची निराशा विकास जाधव जखमी
खानापूर : मोहरमनिमित्त खानापूर येथे आयोजित कुस्ती मैदानातील विकास जाधव (आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, पुणे) विरुद्ध समाधान घोडके (महाराष्ट्र केसरी) यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्तीसाठी दीड लाख रुपयांचे इनाम होते. मैदानात नऊ ते दहा लाख रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली.
पुरातन मॉँसाहेब दर्ग्यात आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती रात्री पावणेनऊ वाजता सुरू झाली. विकास जाधव व समाधान घोडके यांनी सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला. दोघांनीही पाचव्या मिनिटानंतर आक्रमक होत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही अयशस्वी ठरले. अखेर पंधराव्या मिनिटास विकास जाधव जखमी झाला. यावेळी पंचांनी कुस्ती सोडविण्याचा निर्णय घेतला. प्रथम क्रमांकाची कुस्ती सोडविण्यात आल्याने कुस्ती शौकिनांमधून निराशा व्यक्त झाली. या कुस्तीसाठी दीपक मुळीक (रेवणगाव) व कुस्ती कमिटीने बक्षीस ठेवले होते.
मैदानातील द्वितीय क्रमांकाची कुस्ती प्रेक्षणीय झाली. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा मल्ल किरण भगत याने सुरुवातीपासूनच आक्रमक होत आप्पा बुटे (बेणापूर) यास दहाव्या निमिटास झोळी डावावर चितपट केले व कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली. या कुस्तीसाठी शंकरराव देवकर (बलवडी) यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
मैदानातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत जालिंदर म्हारगुडे (बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र, बेणापूर) याने राजाराम यमगर (न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर) याला अस्मान दाखविले. ही कुस्ती अर्धा तास सुरू होती. या कुस्तीसाठी रमेश लोकरे (खानापूर) व गोविंद शिंदे (शेडगेवाडी) यांनी ७५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
दीर्घकाळ सुरू राहिलेली चौथ्या क्रमांकासाठीची नवनाथ इंगळे (न्यू मोतीबाग) व विक्रम चव्हाण (शाहू कुस्ती केंद्र) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविली. या कुस्तीसाठी अॅड. अजितसिंह हजारे यांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
दुपारी तीन वाजता जुन्या पिढीतील स्थानिक मल्ल बाबूराव पिरजादे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून मैदानास सुरुवात झाली. याप्रसंगी आ. अनिलभाऊ बाबर, जि. प. सदस्य सुहास शिंदे, मालोजी शिंदे, रावसाहेब शिंदे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
सायंकाळी मैदानात हजरत नालसाहेब यांनी भेट दिली. माणिक भगत, रामचंद्र देसाई, हमजेखान तांबोळी, रामभाऊ गिड्डे, गणपतराव तोडकर, बजरंग पोरे, प्रकाश जिरगे, रामचंद्र शिंदे, सुरेश भगत, दौलत भगत, इसाक पिरजादे, बाळासाहेब धाबुगडे, विकास भगत, किरण भगत यांनी संयोजन केले. पंच म्हणून जनार्दन भगत, राजकुमार माने, सयाजी माने, लालासाहेब पाटील, डॉ. उदय हजारे, जगन्नाथ कोरबू, राजेंद्र शिंदे, अमिन पिरजादे यांनी काम पाहिले. प्रा. ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. (वार्ताहर)