वल्गनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीवरच भर देणार ‘खंडोबा’
By Admin | Published: November 17, 2014 12:34 AM2014-11-17T00:34:47+5:302014-11-17T00:36:31+5:30
संघाची पूर्ण व्यावसायिकतेकडे वाटचाल : खेळाडूंना व्हीआयपी सुविधा देणारा पहिला संघ
सचिन भोसले- कोल्हापूर -गतवर्षी खेळाडूंमधील समन्वयाअभावी के.एस.ए. लीग स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाच्या फुटबॉल संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदा पुनरागमन करण्यासाठी तोंडाने वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात चांगला खेळ करून चाहत्यांची वाहवा मिळविण्याचा निर्धार ‘खंडोबा’च्या संघाने केला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात फुटबॉल रसिकांना रंगतदार सामने निश्चितच शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर पाहण्यास मिळणार आहेत.
शिवाजी पेठ म्हटले की, पूर्वी शिवाजी तरुण मंडळ, महाकाली भजनी तालीम मंडळ, मर्दानी तालीम मंडळ याच संघांची नावे कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात एकेकाळी शौकिनांकडून घेतली जात होती. मात्र, याला पर्यायी बलवान संघ म्हणून पेठेतून खंडोबा तालीम संघाचा पर्याय १० डिसेंबर १९९३ रोजी उभा राहिला. हा संघ या दिवशी तत्कालीन केळवकर लीग स्पर्धेत वरिष्ठ गट म्हणून पात्र झाला. त्यानंतर या संघाने अनेक वर्षे मागे वळून पाहिलेच नाही. या संघाने आक्रमकतेच्या आणि खेळातील कौशल्याद्वारे अनेक स्पर्धा गाजविल्या.
गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात सुमार दर्जाची कामगिरी केल्यामुळे या संघाने यंदा पुनरागमन होण्यासाठी गोव्यातील अर्जुन शिटगावकर, शशांक सावंत, हुबळीतील चंदर डोका यांसह नेहमीच्याच संघ सहकाऱ्यांचा भरणा केला आहे. खेळाडूंना सरावादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याकरिता संघाचे अध्यक्ष अरुण दळवी, जोतराम जाधव, अमर सासने, आदी कार्यरत आहेत.
संघाची कामगिरी अशी
२००७-२००८उपविजेतेपद
२००९-२०१०उपविजेतेपद
२०१०-२०११विजेतेपद
२०११-२०१२विजेतेपद
पुन्हा अग्रस्थानावर जाण्यासाठी यंदा खेळाडूंचा कसून सराव आणि नियोजनबद्धरीत्या खास व्यायामही घेतला जात आहे. संघाची बांधणी गेल्या चार महिन्यांपासून केली जात आहे.
- अरुण दळवी, अध्यक्ष, खंडोबा तालीम
स्टार खेळाडू : शकील पटेल, विक्रम शिंदे, सुमित जाधव, कपिल साठे, शशांक सावंत, अर्जुन शिटगावकर, चंदर डोका, विकी सुतार, आदी.