ऊस बिले न मिळाल्याचा फटका खरीप पिकांना
By admin | Published: June 4, 2015 11:32 PM2015-06-04T23:32:39+5:302015-06-05T00:19:12+5:30
शेतकरी आर्थिक अरिष्टात : तीन महिन्यांपासून बिले न मिळाल्याने शेतीची कामे खोळंबली
दानोळी : ऊस कारखान्याला जाऊन तीन-चार महिन्यांचा काळ उलटला, तरीही ऊस बिलांचा पत्ताच नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीवर आधारित अनेक उद्योगांसह खरीप पिकांवरही त्याचा परिणाम दिसून येत असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.
प्रत्येकवर्षी शेतकऱ्यांना शेतातील ऊस कारखान्यास गेल्यानंतर स्वातंत्र मिळाल्यासारखा आनंद होतो. उसाचे बिल मिळाल्यानंतर त्यातून कोणती कामे करायची याचे नियोजन केले जाते. हे बिल म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचे सर्वांत मोठे फळ असते. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच तीन महिने झाले, तरी उसाचे बिल मिळाले नाही व कधी मिळणार हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे आपल्या शेतीप्रधान देशात अनेक शेतकऱ्यांना आता दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले असून, अनेक शेतकरी हालाखीचे दिवस काढत आहेत. आज-उद्या बिले येतील या आशेवर उसनवारी करीत आहेत परंतु, ऊसनवारीलाही मर्यादा आल्यामुळे त्यांची अनेक कामे बिलाविना खोळंबली आहेत.
खरीप पिकांच्या पूर्व तयारीसाठी शेतीची मशागत, बियाणे, मजुरांचा पगार, आदींसाठी पैसा नसल्यामुळे खरीप पिकांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. मॉन्सून जवळ आला असून, उसाला खतांचा डोस देण्याची वेळ आली आहे; परंतु आधीची उधारी असल्यामुळे खतांचा डोस कसा द्यायचा, हा प्रश्न पडला आहे.
शेतीची मशागत केलेले ट्रॅक्टर, औषध विक्रेते, रासायनिक खत विक्रेते, आदींची देणे बाकी असल्यामुळे अशा शेतीवर आधारित असणारे उद्योग अडचणीत आले आहेत. तसेच पीक कर्जासह शेतकऱ्यांची वैयक्तिक कर्जेही थकबाकीत गेली आहेत. अशा सोसायट्या, बॅँका, पतसंस्थांच्या उलाढालीवर मोठा परिणाम होत असून, त्यांचा विनाकारण लागलेल्या व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना कोणतेही मासिक वेतन अथवा पेन्शन नाही, त्यामुळे वर्षातून एकदा बिलापोटी मिळणारी रक्कम एकदम खर्च करणारा शेतकरी हा एकमेव वर्ग आहे. त्यांची सर्वच खरेदी थांबल्यामुळे बाजारात मंदी निर्माण झाली आहे. सध्या शाळा, कॉलेज सुरू होत असून, मुलांची अॅडमिशन फी, शालेय साहित्य, आदी खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ऊस बिलाचा प्रश्न ताणून धरला जात असून, कारखानदार व शासनामध्ये शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. बिले लवकर मिळाल्यास त्याचा योग्यवेळी उपयोग करून घेता येईल, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
हे तर ‘सबसे बुरे दिन’
यापूर्वी ऊस बिले वेळेवर मिळत असत; पण ‘अच्छे दिन आयेंगे’, म्हणत भाजप सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच ऊस बिलास जर तीन-चार महिन्यांहून जास्त काळ लागत असेल, तर शेतकऱ्यांसाठी हे तर ‘सबसे बुरे दिन’ आले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे.