पावसाच्या दडीने खरीप पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:40+5:302021-07-08T04:17:40+5:30
सावर्डे : धामणी खोरा (ता. पन्हाळा) परिसरात गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारली असल्याने पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. ...
सावर्डे : धामणी खोरा (ता. पन्हाळा) परिसरात गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारली असल्याने पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याने शेतकरी आता जुलै महिन्यातच नदीकाठी विद्युत पंप बसवून पाण्याची सोय करू लागला आहे.
जुलै-ऑगस्ट महिना म्हटले तर जोरदार पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो.
या दिवसात जोरदार पाऊस पडून नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर पडलेले असते. यंदा मात्र सलग पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली असल्याने डोंगररानातील भात, भुईमूग, नाचणा या खरीप पिकांना धोका पोहोचला आहे. पिकाची अवस्था पाहून शेतकरी कासावीस झाला आहे. चातक पक्ष्याप्रमाणे तो पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे.
नदीकाठावरील बागायत जमिनीलाही पाण्याची ओढ पडली असल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडून पिके कोमेजून गेली आहेत.
आज-उद्या पाऊस येईल या आशेवर शेतकरी वाट पाहत बसला होता; पण पाण्याअभावी पिके हातची जाणार याची खात्री होऊ लागल्याने अखेर सावर्डे (ता. पन्हाळा) परिसरातील शेतकरी नदीकाठी विद्युत पंप जोडणी करून पिकांना पाणी देऊ लागले आहेत.
डोंगररानावरील पिकांना मात्र पाण्याची सोय नसल्याने त्या शेतकऱ्यांची पिके पावसाच्या कृपेवरच अवलंबून आहेत.
पावसाची अशीच उघडीप राहिली तर डोंगररानातील पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.