पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:58 PM2020-09-29T14:58:47+5:302020-09-29T15:00:41+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग वाढली आहे. माळरानावरील भात, भुईमूग काढणीस गती आली असून आणखी चार दिवस पावसाने उसंत घेतली तर सुगी जोरात सुरू होणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग वाढली आहे. माळरानावरील भात, भुईमूग काढणीस गती आली असून आणखी चार दिवस पावसाने उसंत घेतली तर सुगी जोरात सुरू होणार आहे.
यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सून सक्रिय झाल्याने खरिपाची उगवण वेळेत झाली. त्यात पिकांना पोषक असाच पाऊस राहिल्याने वाढ ही जोमात झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात एकसारखा पाऊस सुरू असून कमी कालावधीचे भातपीक सध्या कापणीस आले आहे.
संकरीत बियाणे असल्याने सव्वा तीन महिन्यात भातकाढणीस आले मात्र एकसारखा पाऊस असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शिवारात पाणी उभा राहिल्याने कापणी करायची? कशी आणि त्याची मळणी कुठे करायची? असा पेच त्यांच्यासमोर आहे. त्यात पाऊस थांबण्याचा नावच घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
हातातोंडाला आलेली पिके पाण्यात जाण्याची भीती त्याला होती. मात्र सोमवारी सकाळपासून वातावरणात एकदमच बदल झाला. आकाश स्वच्छ होते, आणि आठपासूनच कडकडीत ऊन राहिले. दिवसभर ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची भातकापणीसाठी लगबग सुरू झाली. विशेषत माळरान, डोंगरमाथ्यावर भात, भुईमूग व सोयाबीन काढणीस वेग आला आहे. आणखी चार-पाच दिवस पावसाने उघडीप दिली तर सुगीला वेग येणार आहे.