पोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:54 AM2019-09-03T10:54:44+5:302019-09-03T10:57:21+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी दडी मारली होती. आठवडाभर दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला होता. अगोदरच नदी व ओढ्याकाठची पिके महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाणी व अतिवृष्टीच्या तडाख्यातून राहिलेल्या पिकांची जोपासना करण्यात सध्या शेतकरी मग्न आहे.
मध्यंतरी पावसाने दडी मारली व वीज कनेक्शन बंद असल्याने पाणी पाजायचे कसे? असा पेच होता. तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. पावसाच्या हलक्या सरी का असेना पण दिवसातून दोन-तीनवेळा कोसळत राहिल्याने तेवढा पिकांना आधार झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा नूर काहीसा बदलला आहे.
करवीरचा पश्चिम भाग, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. सध्या भातपीक गळ्यात (परिपक्वतेकडे) आले आहेत तर कमी कालावधीचे भात बाहेर पडले आहे. नागली, भुईमूग, सोयाबीन पिकांचीही तीच अवस्था असून त्यांना पाण्याची गरज आहे. या पिकांना हवी तेवढीच ओल मुळांना मिळत असल्याने पिके चांगलीच फोफावली आहेत.
दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
आणखी १५-२० दिवस गरज
खरीप पिकांना अजून १५ ते २० दिवस पावसाची गरज आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होईल.
-
धरणातील विसर्ग वाढला
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ८०० वरून १४००, वारणातून २६४७ वरून ५४६०, दूधगंगेतून ८०० वरून ९०० घनफूट पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.
नऊ बंधारे पाण्याखाली
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगेची पातळी सोमवारी सकाळी आठपर्यंत १८ फुटांवर होती. त्यामुळे विविध नद्यांवरील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पिकांना हवा तसाच पाऊस सुरू असल्याने सर्वच पिकांची वाढ चांगली आहे. मध्यंतरी अतिवृष्टीने वाढ खुंटलेल्या ऊस पिकालाही पाऊस पोषक आहे.
- सुरेश खाडे
शेतकरी, चव्हाणवाडी