पन्हाळा तालुक्यात खरिपाची पेरणी पन्नास टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:43+5:302021-06-22T04:17:43+5:30
पन्हाळा तालुक्यात खरीप पेरणीसाठी १७०८४ हे क्षेत्र असून, त्यातील आतापर्यंत केवळ ८३४६ हे क्षेत्रात पेरणी झाली आहे. जादा झालेल्या ...
पन्हाळा तालुक्यात खरीप पेरणीसाठी १७०८४ हे क्षेत्र असून, त्यातील आतापर्यंत केवळ ८३४६ हे क्षेत्रात पेरणी झाली आहे. जादा झालेल्या पावसामुळे अजून आठ ते दहा दिवस पेरणीयोग्य शेती क्षेत्र तयार नसल्याने होणारी पेरणी लांबणार आहे.
चालूवर्षी बाजारी मूल्यात खाद्यतेल महाग झाल्याने शेतकरीवर्ग सूर्यफूल व भुईमूग पीक जादा घेतील असे वाटत होते; पण आतापर्यंत झालेल्या पेरणीत सूर्यफूल कोणत्याही शेतकऱ्याने घेतले नाही, तर भुईमूग २५५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन १४६३ क्षेत्रात घेतला आहे. आडसाली ऊस क्षेत्र कमी झाले असून, केवळ २८८ हेक्टर क्षेत्र उसाखाली लागले आहे. इतर पिकात ज्वारी ५०० हे., तर कडधान्य ३० हेक्टर लावले गेले आहे. भात पीक ३४१७ हेक्टर लावले आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी निरनिराळी प्रात्यक्षिके घेतली आहेत. यात प्रामुख्याने हुमणी कीड नियंत्रण, सोयाबीन उगवण क्षमता व बीजप्रक्रिया, भात उगवण व बीजप्रक्रिया, मक्यावरील किड नियंत्रण, खत बचत याची प्रात्यक्षिके झाली आहेत.
चालूवर्षी तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा नाही. वेळोवेळी खत विक्री केंद्रे तपासली जात आहेत. १५५५.९० मे. टन शेतीयोग्य खतांचा साठा शिल्लक असल्याचे कृषी अधिकारी धायगुडे यांनी सांगितले.