Kolhapur: मुरगूडमधील खाऊ गल्लीची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत
By भीमगोंड देसाई | Published: October 19, 2024 04:31 PM2024-10-19T16:31:15+5:302024-10-19T16:31:38+5:30
कायमस्वरूपी मनाईचा आदेश : महात्मा गांधी रोडवर फेरीवाले, केबिन्सना परवाना देण्याचा घाट
भीमगोंड देसाई
कोल्हापूर : मुरगूड येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रस्त्यावर खाऊ गल्ली करण्याचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि स्थानिक लोकांनी तिथेपर्यंत संघर्ष करून या प्रकरणात न्याय मिळविला आहे.
अंतरिम स्थगितीसाठीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले तरी वादींनी चिकाटीने न्यायालयीन संघर्ष केला. मूळ दाव्यात कायमस्वरूपी खाऊ गल्ली करणे, केबिन्स लावणे, फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास कायमस्वरूपी मनाईचा निकाल दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम. एम. गादिया यांनी नुकताच दिला. सार्वजनिक हितासाठी न्यायालयीन लढाई केल्यानंतर मनमानी प्रशासकीय कामकाजाला कसा धडा मिळतो, हेही यानिमित्ताने पुढे आले.
मुरगूड बसस्थानक परिसरातील ४० फूट रुंदीचा हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून शाळा, कॉलेजची मुले, मुली, डॉक्टर, व्यावसायिक, उद्योजक, कामगार जा-ये करतात. तरीही ४०० फूट लांबीच्या या रस्त्यावर फेरीवाल्यांनी बेकायदेशीर, अनधिकृत, दांडगाव्याने अतिक्रमण करून खाद्यपदार्थांच्या गाड्या लावणे, कायमस्वरूपी खोकीवजा केबीन लावून खाद्यपदार्थ विक्री करीत खाऊ गल्ली तयार केली.
यामुळे वाहतुकीस अडथळा होऊ लागला. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रहिवाशांनाही प्रचंड त्रास होऊ लागला. शिल्लक खाद्यपदार्थ उघड्यावर टाकल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. खाऊ गल्लीत काही गुंडप्रवृत्तीचे लोक येऊन दंगा मस्ती करू लागले. यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यानंतर नगरपालिकेने खाऊ गल्ली काढून टाकली. रस्ता अतिक्रमणमुक्त केला.
दरम्यान, काही कालावधीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीत अधिकारी, राजकीय लोक, नगरसेवकांनी संगनमताने रस्त्याच्या दुतर्फा कायमस्वरूपी केबिन्स उभा करून पुन्हा खाऊ गल्ली करण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्त्याच्या मध्यभागी शासनाच्या निधीतून पेव्हिंग बॉक्स घालून केबिन्स, खोकी उभा करण्याची तयार केली. त्याविरुद्ध सर्जेराव कानडे, दीपक वारके यांच्यासह १४ जणांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मुरगूड नगरपालिकेकडे तक्रार केली.
संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर केबिन्स, खोकी बसवून खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी देणार आहे. तुम्हाला विचारण्याचा कोणताही अधिकार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. याची तक्रार त्यावेळच्या जिल्हाधिकारी यांच्याकडेही करण्यात आली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही.
म्हणून सर्जेराव कानडे यांच्यासह १४ जणांनी येथील दुसरे सह दिवाणी न्यायालयात जिल्हाधिकारी, मुरगूड नगरपालिकेसह व्यावसायिकांविरोधात २० फेब्रुवारी २०२१ मध्ये दावा दाखल केला. त्यांच्या सुनावणीत तक्रारदार वादींच्या बाजूने ॲड. अजित मोहिते, अनंत पाटील, ओंकार पाटील, सर्वेश राणे, प्रथमेश पाटील यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे रस्त्यावर खाऊ गल्ली करण्यास कायमस्वरूपी मनाईचा आदेश न्यायालयाने आहे.
वेगळेपण काय..?
सर्जेराव कानडे, दीपक वारके, सूर्यकांत बरकाळे, अमोल मेटकर, छाया खैरे, दादू बरकाळे, गुंडुराव खैरे, शशिकांत चौगले, आनंद बरकाळे, सुखदेव वारके, सुभाष खैरे, विलास रानमाळे, राजाराम भोसले, बाजीराव कानडे यांनी हा दावा केला होता. त्यांनी १४ जणांना प्रतिवादी केले होते. नागरी प्रश्नांसाठी लोकांनी एकत्रित येऊन दिलेला लढा म्हणून या निकालाला वेगळेच महत्त्व आहे.