शिरोलीत खवरे-करपे यांच्यात काटाजोड सामना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 02:21 PM2022-12-08T14:21:01+5:302022-12-08T15:18:53+5:30
निवडणुकीत पारंपरिक श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि महाडिक गट अशी स्थानिक गट जरी असले तरी एक प्रकारे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशील थेट दुरंगी लढत
सतीश पाटील
शिरोली : शिरोली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पारंपरिक श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि महाडिक गट अशी स्थानिक गट जरी असले तरी एक प्रकारे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशील थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंच पदासाठी उमेदवार रुपाली अनिल खवरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहेत तर पद्मजा कृष्णात करपे या भाजपच्या समर्थक आहेत. सरपंच पद हे सर्व साधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. दोन्ही गट तुल्यबळ असल्याने निवडणूक चुरशीची होणार.
शिरोली ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभाग असून १९३६३ मतदार मतदानाचा कौल देणार आहेत एकूण सदस्य संख्या १७ आहे. यात पुरुष मतदार १०,१२४ तर स्त्री मतदार ९२३९ आहेत. सध्या ग्रामपंचायतीवर श्री शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता अबाधित राखण्यासाठी आघाडीने सरपंच पदासह १७ उमेदवार हे तुल्यबळ दिले आहेत.
तर विद्यमान सरपंच शशिकांत खवरे यांच्या पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सुचित्रा खवरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असून रुपाली खवरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार असल्याचे शशिकांत खवरे यांनी जाहीर केले. रुपाली खवरे या शिवसेना नेते पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे यांच्या पत्नी आहेत.
तर महाडिक गटाकडून माजी उपसरपंच कृष्णात करपे यांच्या पत्नी पद्मजा करपे यांना सरपंच पदासाठी अमल महाडिक यांनी उमेदवारी जाहीर केली असून इतर चार उमेदवारांना माघार घ्यायला लावली. यात भाजपचे तालुकाध्यक्ष आणि गावकामगार पोलीस पाटील राजेश पाटील यांच्या पत्नी राजेश्वरी पाटील यांना महादेवराव महाडिक शेवट पर्यंत उमेदवारी जाहीर करतील अशी आशा होती; पण यावेळी सुद्धा पाटील घराण्याला दुसऱ्यांदा डावलले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील एक सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवण्यासाठी श्री शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेते शशिकांत खवरे, महेश चव्हाण, अनिल खवरे, बाजीराव जाधव यांनी मोठी यंत्रणा लावली आहे. तर सत्तांतर घडवण्यासाठी अमल महाडिक यांनी स्वतः यंत्रणा हाती घेतली आहे.
महाडिक गटाकडून सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या राजेश्वरी पाटील, पुष्पा पाटील, डॉ सोनाली पाटील आणि कमल कौंदाडे यांना माघार घ्यायला लावली आहे.
मुस्लिम समाजाचे जास्त मतदान
या निवडणुकीत एकूण मतदाना पैकी ५ हजार पेक्षा जास्त मतदान हे एकट्या मुस्लिम समाजाचे आहे आणि तसेच पाटील समाजाचे मतदान सुद्धा ३ हजार पेक्षा जास्त आहे हे दोन्ही मतदान निर्णायक आहे.